@maharashtracity

धुळे: धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या तुलनेत ११७ टक्के कर्ज वाटप केले आहे. आतापर्यंत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात २८ हजार ६७२ शेतकर्‍यांना २२४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. याची दखल घेत डीएलसीसीच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी बँकेच्या यंत्रेनेचा गौरव केला.

धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत ११७ टक्के पीक कर्ज वाटप केले. त्यात धुळे जिल्ह्यात १८ हजार ७५८ सभासदांना १३७ कोटी तर नंदुरबार जिल्ह्यात नऊ हजार ९१४ सभासदांना ८७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

दोन्ही जिल्ह्यात १९१ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत आतापर्यंत २२४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी संजय यादव यांनी गुरुवारी खरीप कर्ज वाटपाचा आढावा घेतला. या वेळी मुख्यकार्यकारी अधिकारी वान्मथी सी, लीड बँकेचे व्यवस्थापक मनोज दास, नाबार्डचे विकास व्यवस्थापक विवेक पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जी.एन.पाटील, कर्ज व्यवस्थापक पी.बी.वाघ यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा बँकेने कर्ज वितरणात केलेल्या कामाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते बँकेच्या व्यवस्थापकांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, बँकेने १२ एप्रिलपासून कमाल मर्यादा पत्रके मुदतीत मंजूर केले. तसेच ३१ मार्च अखेर वसुली केलेल्या सर्व सभासदांच्या याद्या तयार करुन प्रत्यक्ष संगणकावर डीपी लिमीट टाकून प्रत्येक सभासदांना रुपे कार्डद्वारे कर्ज वाटप करण्यात आले.

बँकेने २०२० मध्ये वाटप केलेल्या कर्जाची वसुली देखील ९३ टक्के केली आहे. उर्वरित सभासदांनी देखील तातडीने थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here