@maharashtracity

धुळे: शहरात करोना आटोक्यात आला आहे. त्यामुळे बाजार पेठेची वेळ वाढवावी, या मागणीसाठी असोसिएशन ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड कॉमर्सने संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात असोसिएशन ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, उपाध्यक्ष गोकूळ बधान, सचिव किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते, नितीन मोदी, नंदु सोनार, मोहन अग्रवाल आदींनी सहभागी झाले होते.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण भारतात करोनाचे थैमान सुरु असतांना शहरात मात्र करोनाचा वेग आटोक्यात आला आहे. याचे सारे श्रेय जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, मनपाचे आयुक्त अजिज शेख तसेच शहरातील सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्त्यांना आहे. सध्यातरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे धुळेकरांनी निश्‍वास सोडला आहे.

यामुळे शहरातील बाजार पेठेची वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढवून द्यावी. सर्व शासकीय आदेशाचे तंतोतंत पालन करुन धुळे शहरातील बाजार पेठ सुरु आहे. परंतु सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ व्यापारांना आणि ग्राहकांना गैरसोयीचा होतो.

पुढील महिन्यांपासून सण, उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वर्दळ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वेळ वाढवल्यास बाजार पेठेतील गर्दी कमी होईल म्हणून निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन धुळे शहरातील बाजार पेठेची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड कॉमर्सने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here