सोसायटी व उद्योगांचे नियमित ‘फायर ऑडिट’ करण्याची सूचना

By Sachin Unhalekar

Twitter: Rav2Sachin

मुंबई: शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्वदेखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.   

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १४) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड (Mumbai Fire Brigade) तसेच राज्य अग्निशमन सेवेतील १३ अधिकाऱ्यांना व जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके’ प्रदान करण्यात आली, तसेच अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली, त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ १० -१२ लाख होती. आज शहराची लोकसंख्या किमान पंधरा पटीने वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या आज अनेक देशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहराला सशक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 

मुंबईसारख्या शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता (awareness about fire safety) निर्माण करण्यासाठी शाळांना तसेच गृहनिर्माण संस्थांना सहभागी केले पाहिजे, तसेच गृहनिर्माण संस्था व उद्योग संस्थांचे नियमित ‘फायर ऑडिट’ (Fire Audit) केले गेले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here