यंदाच्या रक्षा बंधनाच्या मुहूर्तापासून तपासणीला सुरुवात
Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्यात दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस असून या सर्वांची व्यापक स्वरुपात आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. अंगणवाडी सेविका या तळागाळात सामान्य लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. त्यामुळे त्यांच्याही आरोग्याची तपासणी करावयाचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर ही तपासणी व्यापक स्वरुपात करण्यात येणार असून त्यांना हेल्थ कार्डही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सरकारी आरोग्य योजना उपेक्षित लोकांच्या दारात पोहोचवण्यासाठी अनेक किलोमीटर पायी प्रवास करून स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी अंगणवाडी सेविकांकडून सतत होत होत्या. त्यामुळे देखील आरोग्य तपासणी मोहिम सुरु करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार या तपासणी मोहिमेव्दारे अंगणवाडी सेविकांच्या आरोग्य तक्रारी जाणून घेण्यात येणार आहे. या मोहिमेतून ज्यांना आरोग्य समस्या आढळतील अशांना उपचारासाठी सरकारी संस्थांकडे पाठवले जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
या अंगणवाडी सेविका सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असून एखादी सरकारी आरोग्य योजना राबवायची झाल्यास सामान्य व्यक्तींची आरोग्य माहिती या अंगणवाडी सेविकांकडेच असतो. अशा प्रकारे अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळेच त्यांचे आरोग्य कोणत्याही प्रकारे धोक्यात येऊ नये यासाठी ही व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या प्रती कृतज्ञता म्हणून अशाप्रकारचा पहिला उपक्रम रक्षाबंधनादरम्यान आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी मोहिम शिबिर राबविण्यात येणार आहे. त्यातून त्यांची आरोग्य तपासणी होणार आहेत.