Twitter @maharashtracity

मुंबई: राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये धोरणांच्या अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. सुकाणू समिती आणि सर्व कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.  
दरम्यान पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन,  शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता आणि शैक्षणिक दर्जा, नवीन संशोधन ही उद्दिष्टे ठेवून भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे धोरण तयार करण्यात आले आहे. 

यावर्षी सर्व अकृषी विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालये आणि ज्या संस्थांनी शैक्षणिक उपाययोजना केली आहे अशा संस्थांमध्ये  या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. पुढील शैक्षणिक वर्षात पुर्णतः धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अभ्यास करून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम आराखडा व अनुषंगिक धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या. 

गठित केलेल्या सुकाणू समितीने गेल्या सहा महिन्यांपासून सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून सुधारित अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभाग व राज्यातील पारंपरिक स्वायत्त महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर स्तरावरील बी.ए., बी. कॉम व बी.एस्सी तसेच एम.ए., एम.कॉम व एम.एस्सी व दि.२० एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेले अन्य पारंपरिक अभ्यासक्रम आणि सर्व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर एम.ए., एम.कॉम व एम.एस्सी अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार निश्चित केलेल्या क्रेडीट आराखड्यानुसार राबविले जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

वसतिगृहामध्ये घडलेली घटना दुदैवी

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेली घटना वेदनादायी असून याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्च शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकिंग जाहीर होणार

देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन २०२३ चा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि संस्थांचा क्रमांक वरच्या यादीत असला पाहिजे यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकिंग जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here