मुनगंटीवार, महाजन, तावडे यांना लोकसभेत पाठवणार?

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेत्यांना दिली आहे. काल जाहीर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या यादीत अशी काही नावे आहेत जी कदाचित भविष्यात निवडणुकीत उमेदवारही असू शकतात. तर यातीलच काहींना भाजपने उमेदवारी देण्याचीही तयारी केल्याचे दिसत आहे. यात दिग्गज नेत्यांना आणि काही विद्यमान मंत्र्यांनाही लोकसभेत पाठिवण्याची रणनिती जाहीर झालेल्या निवडणूक प्रमुख यादीवरून लक्षात येते.

यामध्ये मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, सरचिटणीस विनोद तावडे, विद्यमान आमदार अमित साटम, पराग अळवणी हे भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभेसाठी विद्यमान मंत्री गिरीश महाजन हे असू शकतात. महाजन यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या राधेश्याम चौधरी यांना मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून भाजपच्या अंतर्गत गोटात काय चालले आहे याचा अंदाज येतो.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रमोद कडू यांच्याकडे देण्यात आली आहे. आता कडू हे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी लोकसभेची जमीन तयार करतील असे दिसते. मात्र, अधिकृत नावांची घोषणा होत नाही तोपर्यंत खरे चित्र स्पष्ट होणार नाही.

उत्तर मुंबई हा भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून योगेश सागर यांना नियुक्ती दिली आहे. भाजप नेते विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. त्यांचेही राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा विचार आहे. आमदार योगेश सागर हे विनोद तावडे यांच्यासाठी मैदान तयार करतील. तसेही याठिकाणी असलेले विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी जवळपास निवृत्तीची घोषणा केलेलीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here