मुख्याध्यापकाला केले निलंबित, माजी विद्यार्थी एकवटले
मुजोर संस्थाचालकांच्या विरोधात वरळीकरांचे आंदोलन
गमरे सरांना शाळेवर घ्या, मगच शाळा सुरु करा,
माजी विद्यार्थ्यांचा इशारा
Twitter: @maharashtracity
मुंबई: वरळीतील मराठा हायस्कूल या शाळेचे मुख्याध्यापक हेमंत गमरे यांच्यावर मुजोर संस्थाचालकांनी कारवाई करत त्यांचे निलंबन केले आहे. काही वर्षाआधी याच संस्थाचालकांनी त्यांची पत्नी सौ. ऋतुजा गमरे यांच्यावर अशाच प्रकारे निलंबनाची कारवाई केली होती. या दाम्पत्यांनी मराठी हायस्कूल या शाळेत अनेक पिढ्या घडवल्या आहेत, आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी उच्चपदावर आहेत. केवळ राजकारणामुळे या दोन्ही शिक्षकांवर सूडाने कारवाई केली जात आहे. या कारवाईच्या विरोधात सर्व आजी – माजी विद्यार्थी व पालक शाळेच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
गमरे सरांनी जवळपास साडेतीन दशकं शाळेत काम केलं आहे. १९८७ साली गमरे सरांनी शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात केली होती, मराठा हायस्कूल या शाळेची स्थापना १८८६ मध्ये झाली आहे. सुरुवातीला ही शाळा गिरगाव येथे होती. त्यानंतर ती वरळी येथे सुरु करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रिकेटपटू एकनाथ सोलकर, रॅंगलर पंराजपे असे महान व्यक्ती या शाळेत शिकले आहेत.
या शाळेचे चेअरमन देवदास कदम हे संपुर्ण कारभार सांभाळतात व तसेच त्यांची पत्नी सौ स्मिता कदम या देखील याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. देवदास कदम हे मुंबई बॅंकेत कार्यकारी संचालक या पदावरदेखील कार्यरत आहेत.
गमरे सरांवरील कारवाई मागे घेण्यासंदर्भात शाळेला काही दिवसांपुर्वी माजी विद्यार्थ्यांनी पत्र दिले होते. पण शाळेच्या संचालक मंडळानं या पत्राला केराची टोपली दाखवली व पुढील १५ दिवसांतच मुख्याध्यापक गमरे यांच्यावर निलंबनांची कारवाई करण्यात आली. शाळेच्या या भोंगळ कारभाराला वरळीकर कंटाळले आहेत. काही जणांनी आपल्या पाल्याची ॲडमिशन काढून निषेध केला आहे व भविष्यात या शाळेत एकही विद्यार्थी न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या शाळेच्या संचालक मंडळाचा पत्राद्वारे निषेध केला आहे.