महाड: आपत्ती काळात तत्काळ मदतकार्य सुरु करता यावे यासाठी 4 महिने एनडीआरएफची टीम (NDRF team) महाड येथे तैनात करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असुन एनडीआरएफची 25 जणांची टिम आज महाडमध्ये (Mahad) दाखल झाली. यामुळे महाडकरांना दिलासा मिळाला आहे.

महाड शहरासह संपूर्ण तालुक्यावर पावसाळ्यात पूर, दरड कोसळणे (landsliding) अशा आपत्तीची टांगती तलवार असते. गतवर्षी महाड शहर व तालुक्यात महापूराने (flood) थैमान घातले होते. तर तळीये येथे दरड कोसळून 86 जणांचे बळी गेले होते. रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती होत असते. यामध्ये महाड व पोलादपूर तालुके हे आपद्ग्रस्त तालुके म्हणून ओळखले जात आहेत.

अनेकदा आपत्तीनंतर तातडीने मदत कार्य मिळत नसल्याने तसेच मदत कार्यामध्ये मर्यादा येत असल्याने एनडीआरएफचे पथक मागवावे लागत असते. पथक दाखल होईपर्यंत विलंब होत असल्याने मोठी हानी होत असते. त्यामुळे महाड येथे एनडीआरएफचा बेसकॅम्प असावा अशी मागणी नागरिकांसोबत लोकप्रतिनिधींनी देखील केली होती.

त्यामुळे महाड येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी असावे या मागणीला राज्य सरकार बरोबरच आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक शासकीय दूध योजना येथील 2.57.46 हेक्टर आर. इतके क्षेत्र राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना कायमस्वरुपी बेस कॅम्प तयार करण्यासाठी उपलब्ध दिले आहे.

पुढील दोन – तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून एनडीआरएफची टिम आज महाडमध्ये दाखल झाली आहे. 25 जणांची टिम आता पुढील दोन महिने महाड शहरात तळ ठोकणार आहे. या टिमचे प्रमुख बी. महेश यांच्याशी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व तहसिलदार सुरेश काशिद यांनी चर्चा करून तालुक्यातील दरडग्रस्त गावांची माहिती दिली.

या टिमचा तालुक्यातील दौरा निश्चित करण्यात आला आहे. या टिमची राहण्याची व्यवस्था संत रोहीदास सभागृह येथे करण्यात आली आहे. या टिमसोबत महाड नगर परिषदेची टिम, त्याच बरोबर साळुंखे रेस्क्यु टिम देखील आपत्ती काळात मदतीसाठी असणार आहे. याच बरोबर जिल्हा प्रशासनाकडून बचाव साहित्य पुढील आठवड्यात प्राप्त झाल्यानंतर त्याचे तातडीने गरजेनुसार वाटप करण्यात येईल, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here