५ ठिकाणी घरांची तर १४ ठिकाणी झाडे/ फांद्यांची पडझड

५ ठिकाणी शॉर्टसर्किट

चार तास मुसळधार पावसाची बरसात

@maharashtracity

मुंबई: मुंबईत सोमवारी दुपारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा (heavy rain) रेल्वे व रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची सीएसटी स्थानकात रेल्वे गाडी पकडण्यासाठी एकच धावपळ झाली. मुसळधार पावसामुळे भयभीत झालेल्या पालकांनी आपल्या बच्चे कंपनीला घरी नेण्यासाठी शाळांच्या गेटवर संध्याकाळी चांगलीच गर्दी केली. तर बेस्ट बसमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळाली.

किंग्ज सर्कल, हिंदमाता, सायन, वडाळा, चेंबूर आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. मात्र, पालिकेने पंपाच्या साहाय्याने साचलेल्या पावसाच्या (waterlogging) पाण्याचा निचरा केला. काही ठिकाणी झाडे/ फांद्या, , घरे, भिंती यांची पडझड झाली. मात्र त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, आगामी २४ तासात मुंबईत काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात – २१ मिमी, पूर्व उपनगरात – १७ मिमी तर पश्चिम उपनगरात – २५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई शहर भागातील वरळी, प्रभादेवी येथे २२ मिमी, परळ -२० मिमी, मुंबई सेंट्रल, हाजीअली – १९ मिमी, मलबार हिल – १७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरात – विक्रोळी – १७ मिमी इतक्या पावसाची तर पश्चिम उपनगरात – वांद्रे – सांताक्रूझ -१८ मिमी, खार – २० मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी उपनगर भागात पावसाने चांगली बरसात केली. मात्र त्यानंतर काहीशी विश्रांती घेतल्यावर दुपारी ३.३० नंतरपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. रस्त्यावर ये – जा करणाऱ्या वाहनांना समोरून येणारी वाहने मुसळधार पावसामुळे नीटपणे दिसत नव्हती. तर रेल्वे वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाला. संध्याकाळच्या सुमारास रेल्वे वाहतूक काहीशा विलंबाने सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here