राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार…..

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्थेतील माझे सहकारी व माजी सनदी अधिकारी शरद काळे यांच्या दु:खद निधनाने मला धक्का बसला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांनी आपली शोकभावना व्यक्त केली.

१९६३ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेले शरद काळे यांनी अभ्यासू वृत्ती, शांत-संयमी स्वभाव, सचोटी या गुणांच्या बळावर राज्य आणि केंद्र सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे सांभाळल्या. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त, सहकार आयुक्त, योजना सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख, लोकायुक्त अशा महत्वाच्या पदी काम करत असताना त्यांनी एक ‘लोकाभिमुख व पारदर्शी प्रशासक’ असा आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्यामधील या अंगभूत गुणांमुळेच त्यांना केंद्र सरकारमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाली असेही पवार यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले.

वित्त व योजना विषयांचा जाणकार अधिकारी म्हणून त्यांची दिल्लीत ओळख होती.शरद काळे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेमध्ये ते अनेक वर्षांपासून सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. ‘प्रथम’ ह्या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बालशिक्षण प्रसार व गुणवत्तावाढ कामात तसेच एशियाटीक लायब्ररीचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना साहित्य संवर्धन,संशोधन व ज्ञानप्रसार कार्यात मोलाचे योगदान दिले.शरद काळे यांच्या निधनाने मी एका अतिशय प्रामाणिक, परिपक्व सहकाऱ्याला मुकलो आहे. त्यांच्या कुटुंबियांना या संकटातून सावरण्याचे बळ मिळो आणि शरद काळे यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो अशी प्रार्थनाही पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here