मान्सून रेघेने वेंगुर्ला गाठले

मुंबई: भारतीय हवामान विभागाकडून शुक्रवारी राज्यासाठी मान्सून आनंदवार्ता देण्यात आली. केरळ- कर्नाटक राज्यावर रेंगाळणारा मान्सून गोवा ओलांडून राज्यातील वेंगुर्ला तालुक्यात दाखल झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे राज्यात नैऋत्य मोसमी वारे दाखल झाल्याची सुखदवार्ता आहे. आगामी दोन दिवसांत मान्सून राज्यात आणखी काही प्रदेश पादक्रांत करेल, अशी मान्सून पुरक वातावरण स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शहरात ३४ तर उपनगरात ३५ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले. तसेच शहरात २६ तसेच उपनगरात २५ अंश सेल्सिअस असे किमान तापमान नोंद झाले आहे. किमान तापमान कमी होण्यामागे गुरुवारी झालेल्या पूर्व मान्सून पावसाचे कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी पुण्यात दुपारी सव्वा तीन वाजल्यानंतर गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला होता. तसेच ३० ते ४० प्रति तास किमी वेगाने वारा वाहण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस सक्रीय होण्याची ही चिन्ह असल्याचे सांगण्यात आले.

यावर बोलताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, मान्सूनने महाराष्ट्राच्या वेंगुर्ल्यात हजेरी लावली आहे. आगामी दिवसात रविवार १२ जून पर्यंत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह रत्नागिरी सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सून आगेकूच करण्याची अनुकूलता आहे. तर आगामी ५ दिवस मुंबईसह कोकणात जोराचे वारे, विजा, गडगडाटसह जोरदार अवकाळी पूर्व मोसमी पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.

तर रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्रातील खान्देशसह नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात तर नंतरच्या दोन दिवसानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यातही मान्सूनची शक्यता जाणवते. संपूर्ण विदर्भात आगामी ५ दिवस गारपीटसह तसेच पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here