12 मे जागतिक परिचारिका दिन

@maharashtracity

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Health Department) आणि वैद्यकीय शिक्षण विभाग (Medical Education Department) अशा दोन विभागाकडून राज्यात रुग्णालये चालविली जातात. मात्र, सर्वसामान्यांना सहज आणि स्वस्त रुग्णसेवा देणाऱ्या या रुग्णालयांमधील परिचारिका (Nurses) गेल्या कित्येक वर्षापासून हवालदिल झाल्या आहेत.

इंडीयन नर्सिंग कौन्सिलप्रमाणे (Indian Nursing Council) रुग्ण-परिचारिका प्रमाण सर्रास पाळले जात नसताना आता परिचारिका क्षेत्राचे खासगीकरण करण्यात येणार या भीतीने चिंतित झाल्या आहेत. राज्य सरकारी रुग्णालयात परिचारिकांचा तुटवडा, त्यांच्या बदल्या (Transfer) आणि खासगीकरण (Privatisation) या विरोधात परिचारिकांचा लढा कायम सुरु असून आता त्या पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे जागतिक परिचारिका दिनाच्या (World Nursing Day) पूर्वसंध्येला सांगण्यात आले.

१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका म्हणून जगभर साजरा केला जातो. इंडियन नर्सिंग कॉन्सिलच्या नियमानुसार तीन रुग्णांमागे एक परिचारिका हवी. तसेच अतिदक्षात विभागात (ICU) एकास एक असे प्रमाण सांगते. असे असताना अतिदक्षता विभागात १५ रुग्णांमागे १ परिचारिका असे काम सुरु असल्याचे परिचर्या समन्वय संघटनेच्या कार्याध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले.

जे जे रुग्णालयात (JJ Hospital) रुग्णसंख्येच्या तुलनेत अडीच हजार परिचारिकांची गरज असताना निव्वळ ७५० परिचारिका रुग्णसेवा करत आहेत. या ठिकाणी परिचारिका निवृत्त होतात. तसेच विविध विभाग नव्याने उघडले जातात. मात्र, पद निर्मिती केली जात नसून त्याच मनुष्यबळात रुग्णसेवा केली जात असल्याचे गजबे म्हणाल्या.

हेमलता गजबे या जे जे रुग्णालयात गेली दहा वर्षे ट्युटर पदावर काम करत आहेत. या ठिकाणी ४४ नर्सिंग ट्युटरची आवश्यकता असताना ७ ट्युटर सोबत काम केले जात असल्याचे सांगण्यात आले. या नर्सिंग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊ शकू का असा सवाल करत मी दहा जणांचे काम करत असल्याचे हेमलता गजबे यांनी सांगितले.

शासनाला वारंवार निवेदन देण्यात येऊन ही ऐकले जात नाही. यामुळे सामान्य नागरिकांना, रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच आशा कार्यकर्तींना योग्य प्रकारे प्रशिक्षित करु शकत नसल्याचे सांगण्यात आले.

बदल्यांचे धोरण

सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये बदल्यांचे धोरण परिचारिकांना डोकेदुखी ठरणारे आहे. अशा प्रकारे बदल्याचे धोरण लांबविल्यास परिचारिकांचे संपूर्ण कुटुंब विस्कळीत होण्याची भिती असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परिचारिका गेल्यास ती त्या क्षमतेने रुग्णसेवा देऊ शकेल का असा प्रश्न आहे. बदल्यांचे हे धोरण थांबविल्यास कमीत कमी मनुष्यबळातही ताकदीची रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करु असे सांगण्यात आले. दर तीन वर्षांनी बदली परिपत्रकाचे मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागतो. स्थिर राहू देत नाहीत. बदलीसाठी वर्ग तीन आणि वर्ग चारच दिसतो का असा सवाल ते करतात. यावर्गावरच नेहमी टांगती तलवार का असा सवाल विचारण्यात आला.

खासगीकरणांची भिती

परिचारिकांचे खासगीकरण करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. रुग्णसेवेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचारिकांचे खासगीकरण करणार असून यातून रुग्णसेवाच धोक्यात येऊ शकते. कोविड काळात परिचारिकांना हवे तसे राबवून घेतले. मात्र, आम्हाला कधी कोविड योद्धा म्हणून सन्मान केला नसल्याची खंत यावेळी मांडण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here