@maharashtracity

धुळे – ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, धुळे व सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेवुन आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार व नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या मार्गदर्शनात आज गुरुवार दि. १७ जुन रोजी सकाळी ११:०० वाजता मुंबई-इंदौर महामार्गावरील हॉटेल साई किशन समोर नगावबारी देवपूर येथे रास्ता रोको करण्यात आला.

यात जिल्ह्यातील तमाम ओबीसी संघटनांचा समावेश असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधव, समता परिषदेचे पदाधिकारी व समता सैनिक मोठ्या संख्येने सामिल झाले.

राज्यातील ५ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकेच्या एकूण २७३६ जागांमधुन ७४० जागा कमी होत आहे. १२८ नगरपंचायती व २४१ नगरपालिका मधल्या ७४९३ जागांपैकी २०९९ जागा कमी होणार आहे. ३४ जिल्हा परिषदेतील २००० जागांपैकी ५३५ जागा तर ३५१ पंचायत समितीमध्ये ४००० जागापैकी १०२९ जागा कमी होणार आहेत. २७७८२ ग्रामपंचायतमध्ये अंदाजे १९०६९१ जागांपैकी ५१४८६ जागा ह्या ओबीसी समाजाच्या कमी होत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयाचा कोणताही परिणाम नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होत नसला तरीही राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. म्हणून ओबीसी राजकीय आरक्षण आक्रोश मोर्चा रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या आंदोलनात समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, गोपाल देवरे, सतिष महाले, बापु महाजन, बापु खलाणे, आर.के.माळी, गणेश चौधरी, डॉ. सुशिल महाजन, ज्ञानेश्‍वर माळी, अशपाक शेख, राजेंद्र बैरागी, राकेश बोरसे, शाम माळी, रमेश माळी, गुलाब माळी, सुनिल देवरे, सुनिल अहिरराव, सलीम बागवान, शकील बागवान, अनिल माळी आदी सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here