@maharashtracity

मुंबई: मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प (water desalination) सुरु करणे हे महत्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त रुप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज केले.

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास इस्त्रायलचे (Israel) महावाणिज्यदुत याकोव फिनकेलस्टाईन, वकालतीमधील अन्य सदस्य, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलीजीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्याप्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते. परंतू, त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असतांना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मुर्त रुपाला येत आहे.

सन २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल. शेवटी विकास करतांना या सगळ्या बाबी विचारात घेणे महत्वाचे आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नि:क्षारीकरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये

· २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची क्षमता

· मे २०२२ पर्यंत डीपीआर तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरु होण्याची अपेक्षा. याद्वारे मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी

· अनियमित-लहरी पाऊस, वातावरणीय बदल यामुळे मुंबईकरांना दरवर्षी १५ ते २० टक्के पाणी कपातीस सामोरे जावे लागते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह जलस्त्रोताचा विकास

· महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मनोरी, मलाड येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रकल्पाची अंमलबजावणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी जागेत प्रकल्प उभारणी

· मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता तुलनात्मकदृष्टीने चांगली असून समुद्राचे पाणी उचलून नि:क्षारीकरण प्रकल्पात आणण्याकरिता तसेच प्रक्रियेनंतरच्या क्षाराच्या निर्गमनाकरिता खुल्या समुद्राची उपलब्धता असलेले हे ठिकाण कांदळवन विरिहित आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रापासून दूर आहे. मानवी वस्ती, शेत जमीन, मासेमारी जेट्टी ही दूर असून सर्व निकषांवर पात्र ठरणारी ही जागा नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी योग्य आहे.

· करार झाल्यापासून १० महिन्याच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त होईल. हा प्रकल्प अहवाल तयार करतांना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण, भुपृष्ठीय सर्वेक्षण, भुभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण, पर्यावरण निर्धारण अभ्यास (सागरी व जमीनीवरील), डिफ्युजर, खाऱ्या पाण्याच्या निर्गमनाच्या रचनात्मक बाबींची गणितीक प्रतिकृती , समुद्राच्या पाण्याच्या आदान तसेच क्षाराच्या निर्गमनाचे स्थळ निश्चित करून संकल्प चित्रे तयार करणे, किनापट्टी नियमन क्षेत्रीय अभ्यास व तदअनुषंगिक परवानग्या प्राप्त करण्याची कामे हाती घेण्यात येतील

· सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प बांधकामाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सविस्तर निविदा प्रक्रिया राबवून यथायोग्य कार्यवाही केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here