@maharashtracity

धुळे: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई पुस्तकातील संस्कार कथांचा ऑडिबल स्वरूपात अभिवाचन उपक्रम धुळे जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. आज १ जुलैपासून जिल्ह्यात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

कोविड काळात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासह संपूर्ण समाजव्यवस्था व्यथित झाली असताना गेले वर्षभर विद्यार्थी शाळेतील शिक्षण आणि कळत नकळत केले जाणार्‍या संस्कारापासून वंचित आहेत. विद्यार्थी घरी राहून निरस झाली आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाने माणुसकी, संवेदना यावर देखील आघात केला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ठायी संस्काराचे बाळकडू रुजावे, त्यांच्यात भावी पिढीला आवश्यक असणारी संस्कारमूल्ये, जीवनकौशल्ये विकसित होऊन भक्कम विचारांची संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी श्यामची आई या मातृप्रेमाचे धडे देणार्‍या पुस्तकातील संस्कार कथांचे ऑडिबल स्वरूपात अभिवाचनाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे शिक्षणाधिकारी मनीष पवार आणि सर फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा उपक्रम संयोजक सुनील मोरे यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले.

या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना करून द्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी पवार यांनी चारही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना केले आहे.

या उपक्रमात जिल्ह्यातील चारही तालुक्यातून २२ पुरुष व २२ महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. १ जुलैपासून दरदिवशी एक याप्रमाणे जिल्ह्याभरातील इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी समाविष्ट असलेल्या व्हाट्सऍप्प समूहाद्वारे ऑडिबल स्वरूपात कथा प्रसारित केल्या जाणार आहेत. तसेच त्याचा आढावा देखील घेतला जाणार आहे. ४४ दिवस चालणार्‍या या उपक्रमाच्या माध्यमातून अनायसे विद्यार्थ्यांची शाळापूर्वतयारी होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासासह नीतिमूल्यांचे देखील शिक्षण मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here