@maharashtracity

मुंबई: शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.

कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी कृषीदिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे याचा उल्लेख करत कोरोना काळात शेतकरी आणि डॉक्टर यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना हे दोन्ही अन्नदाते आणि जीवनदाते असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

शेतकरी राज्याचे वैभव

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी राजा राज्याचे वैभव असून ते जपण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातुन केले जात आहे. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत आहे.

राज्यात दुष्काळ, पूर, गारपीट, कोरोना असे संकट आले, मात्र शेतकरी डगमगला नाही. सोन्यासारखे पिक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते अशा वेळी शासन म्हणून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्जमुक्ती देऊन कामकाजाची सुरुवात

आमचे सरकार आल्यानंतर त्याच्या कामकाजाची सुरुवात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन केली. कोरानाच्या संकटाला दीड वर्षापासुन राज्य तोंड देत आहे. मात्र या काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले आहे ते विसरता येण्यासारखे नाही, असे सांगतांनाच उद्योगाप्रमाणे शेतीतही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जोन्नती केली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने विकेल ते पिकेल ही योजना सुरु केली. शेतकरी जे पिकवेल ते विकले गेले पाहिजे. त्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे अशी आमची भुमिका असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here