@maharashtracity

कामबंद आंदोलनाचा राज् लघुवेतन कर्मचारी संघटनेचा इशारा

@maharashtracity

धुळे: धुळे (Dhule) शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Hire Government Medical College) गेल्या २० वर्षांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची भरती झालेली नाही. येथे सुमारे ७०० खाटांसाठी फक्त २०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे. परिणामी, रिक्त पदांवर ३० दिवसांच्या आत कर्मचार्‍यांची भरती करावी, अन्यथा कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य लघुवेतन कर्मचारी संघाने दिला आहे.

याविषयी कर्मचारी संघटनेने अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांना निवेदन दिले. यावेळी
महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. दीपक शेजवळ, राज्य लघुवेतन कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष गिरीश चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत बनसोडे, विभागीय सचिव विनोद सोनार, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सरलाबाई शिरसाठ, विभागीय सचिव कांताबाई वर्पे, जिल्हाध्यक्ष गोकुळ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर, आदी कर्मचारी उपस्थित होते.

राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांविषयी अनेक वेळा आंदोलने झालीत. तसेच यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले आहे. पण अद्यापही प्रलंबित प्रश्‍न सुटलेले नाहित.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरावी, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिले प्रलंबित असल्याने ती मंजूर करावी, क्ष-किरण विभागात स्वच्छतेसाठी वर्ग चार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी, निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक पडताळणीसाठी जमा करण्यात आले आहेत. ते त्वरित पडताळणी व्हावे, महिला कक्षामध्ये अनेक दिवसांपासून एकच कर्मचारी कार्यरत आहे. त्या ठिकाणी चार कर्मचारी वाढवण्यात यावेत, ओपीडीमध्ये केस पेपर काढण्यासाठी एक खिडकी बंद आहे, ती सुरू करण्यात यावी, कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यात यावी.

तसेच दोन शिफ्टमध्ये काम देण्यात यावे. वॉर्डात कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचार्‍याला ई-फार्म देण्यासाठी जावे लागते. यामुळे कामाचा खोळंबा होत असतो. या करिता अपघात विभागात पोलिस चौकीची सोय करण्यात यावी, कर्मचार्‍यांना त्यांच्या पदाप्रमाणे काम द्यावे, ज्या कर्मचार्‍याचे वय ५० वर्षांच्या वर आहे व ज्यांना दुर्धर आजार आहे, त्या कर्मचार्‍यांना जोखमीचे काम देऊ नये, नियमाप्रमाणे बदलीचे आदेश द्यावेत, यासह अन्य मागण्यांसंदर्भात राज्य लघुवेतन कर्मचारी संघाच्यावतीने अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here