सर्वेक्षणातून मेटाबॉलिक सिंड्रोमवर अहवाल
Twitte : @maharashtracity
मुंबई: स्त्रियांना चयापचय समस्यांचा धोका जास्त असतो का? एल एच हिरानंदानी हॉस्पिटलच्या मेटाबॉलिक सेंटरद्वारे (Metabolic centre of Hiranandani Hospital) नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले जेथे ते उपचारासाठी केंद्राकडे येणाऱ्या रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की एकूण रुग्णांपैकी ६८ टक्के स्त्रिया चयापचयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होत्या. दरम्यान, सुमारे ८२ टक्के रुग्णांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मधुमेह (diabetes) किंवा उच्च रक्तदाबाचा (High blood pressure) इतिहास आहे. तज्ञांच्या मते, सध्या सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याची गरज आहे. अन्यथा लोक मेटाबॉलिक सिंड्रोमला (metabolic syndrome) बळी पडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात आली.
मेटाबॉलिक सिंड्रोम हा एकत्रितपणे त्रासिक ठरू शकतो. यातून हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. या स्थितींमध्ये रक्तदाब वाढणे, उच्च रक्त शर्करा, कंबरेभोवती शरीरातील अतिरिक्त चरबी आणि असामान्य कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइड पातळी यांचा समावेश होतो. चयापचय विषयक समस्यांची जाणून घेण्यासाठी एलएच हिरानंदानी हॉस्पिटल, पवई हॉस्पिटलच्या मेटाबॉलिक सेंटरमध्ये रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले जाते. केंद्रात येणाऱ्या ३३ रुग्णांपैकी ३७६ (६८ टक्के) स्त्रिया आणि १७७ (३२ टक्के) मेटाबॉलिक सिंड्रोमने पीडित असल्याचे आकडेवारीवरून समोर आले.
सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की ७८ टक्के रुग्ण विवाहित असून २१ टक्के अविवाहित होत्या. तसेच रुग्णांच्या कौटुंबिक आरोग्य पार्श्वभूमीबाबत विचारले असता ८१ टक्के रुग्णांना एकतर मधुमेह आहे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला मधुमेह आढळला. तसेच ७८ टक्के रुग्णांना एकतर उच्च रक्तदाब होता किंवा कुटुंबातील सदस्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. यावर एलएच हिरानंदानी हॉस्पिटलमधील मेटाबॉलिक सेंटरच्या डॉ. सुषमा संघवी म्हणाल्या की, पुरुषांपेक्षा महिलांना मधुमेह होण्याची अनेक कारणे असू शकतात. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे स्नायू बळकट असतात. तसेच शहरी भागातील स्त्रियांना बसून राहण्याची सवय असते. शिवाय त्या मधुमेहाबद्दल कमी जागरुक असून तपासणी करण्यास संकोच करतात. त्याचसोबत लठ्ठपणा हे देखील महत्त्वाचे ठरते. गर्भावस्थेत मधुमेहाचा इतिहास असल्यास अधिक धोका असतो. मात्र एका पद्धतशीर नियोजनाने मधुमेहाला प्रतिबंधित केले जाऊ शकते. आमच्या हॉस्पिटलमधील मधुमेह प्रतिबंधात्मक कार्यक्रम सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच ज्यांच्या पालकांना उच्च रक्तदाबाची पार्श्वभूमी आहे, अशांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर, उच्च रक्त शर्करा असे त्रास उद्भवू शकतात.