Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी ७११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर चार कोरोना मृत्यू नोंदविण्यात आले. याप्रकारे मंगळवारी राज्यात रुग्णसंख्या आणि मृत्यू दोन्ही वाढलेले दिसून आले. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,४६,३०१ झाली आहे.
तसेच मंगळवारी ४४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९४,०६० कोरोना बाधित रुग्ण (corona patients) बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात मंगळवारी चार कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर (death rate) १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६६,५५,३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,४६,३०१ (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३७९२ सक्रिय रुग्ण आहेत.
सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार २४ डिसेंबर २०२२ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या मध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून दोन टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे.
आज सकाळपर्यंत विमानतळावरील या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत एकूण १६,९२,७८८ प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आले असून यातील ३७,७२६ प्रवाशांची आर टी पी सी आर (RTPCR test) करण्यात आली. तसेच आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी ५५ प्रवाशांचे नमुने पाठविण्यात आले.
आतापर्यंत आढळलेल्या ५५ रुग्णांपैकी अकरा रुग्ण पुणे, अकरा रुग्ण मुंबई, नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा, नागपूर प्रत्येकी एक रुग्ण आणि सहा रुग्ण गुजरात, चार रुग्ण उत्तर प्रदेश, तीन रुग्ण केरळ तर तामिळनाडू, राजस्थान, ओडीसा प्रत्येकी दोन, आणि गोवा, आसाम, बिहार, तेलंगाना, हैदराबाद, चेन्नई, पंजाब, वेस्ट बंगाल येथील प्रत्येकी एक रुग्ण असे असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबईत (Mumbai) मंगळवारी २१८ नवे कोविड रुग्ण आढळले असून आता ११,५६,८२४ कोविड रुग्ण झाले. तर एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले. आता पर्यंत मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १९,७४७ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले.