राजावाडी रुग्णालयातील ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू

मुंबई: घाटकोपर ( पूर्व) येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयू कक्षात मेंदूज्वर व लिव्हर या आजाराने त्रस्त श्रीनिवास यल्लपा (२४) हा बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये असताना त्याचा डावा डोळा उंदराने कुरतडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मात्र बुधवारी या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यामुळे या घटनेला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, त्या रुग्णाचा मृत्यू होण्यापूर्वी पालिकेत बुधवारी पार पडलेल्या पालिका स्थायी समितीच्या बैठकीत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सदर घटनेची चौकशी करून संबंधित आयसीयू चालविणाऱ्या खासगी कंत्राटदाराला जबाबदार धरत कारवाईची मागणी केली होती. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवन्त जाधव यांनी, पालिकेने सदर घटनेप्रकरणी आगामी बैठकीत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात श्रीनिवास यल्लपा (२४) या तरुणाला मेंदूज्वर व लिव्हरचा त्रास असल्याने व त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी दोन दिवसांपूर्वीच दाखल करण्यात आले होते. त्याला आयसीयू विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. मात्र तो बेधुद्ध अवस्थेत असताना त्याच्या डाव्या डोळयाचा काही भाग उंदराने कुरतडल्याने आणि डोळ्याच्या खालील भागातून रक्त निघत असल्याचे त्याच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली होती.

रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रकरणी विचारणा केल्यावर तेथील नर्सने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला होता.
मात्र तात्काळ संबंधित डॉक्टरांना बोलावल्यानंतर सदर रुग्णाच्या जखमी डोळ्यावर उपचार करण्यात आले.

ही घटना उघडकीस आल्यावर २४ तास उलटण्यापूर्वीच उपचारादरम्यान या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला काहीसे वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र याप्रकरणी पालिका आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांच्याकडे विचारणा केली असता, त्या रुग्णाची प्रकृती अगोदरपासून गंभीर होती. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. परंतु उंदराने त्याच्या डोळ्याच्या खालील भागात कुरतडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला नाही.

मात्र त्याच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी सूचना राजुल पटेल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here