आयसीयू विभाग चालवणाऱ्या खासगी कंत्राटदारावर ठपका

भंगार सामानामुळे रुग्णालयात उंदरांचा वावर
पिडीत रुग्णाला आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी

मुंबई

पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील (Rajawadi hospital) आयसीयू विभागात बेशुद्ध अवस्थेत उपचार घेणाऱ्या एक रुग्णाच्या डोळ्याचा भाग उंदराने कुरतडल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. अपेक्षेप्रमाणे या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या (Standing Committee) बैठकीत उमटले.

यावेळी, कंत्राटदाराने आयसीयूसमोर विभागाच्या नजीक भंगार सामान ठेवल्याने उंदरांचा वावर वाढल्याचे कारण समोर आले. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, पालिका प्रशासनाने या घटनेबाबत सविस्तर स्पष्टीकरण आगामी बैठकीत द्यावे, असे आदेश प्रशासनाला दिले.

पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी, पालिकेने ज्या संस्थांना खासगीरित्या आयसीयू (ICU) विभागाची जबाबदारी दिली आहे, त्यांनीच या विभागाची देखभाल दुरुस्ती व सुरक्षितता पाहणे आणि रुग्णांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगत त्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा या घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप केला.

त्या कंत्राटदाराने, राजावाडी रुग्णालयातील तळमजल्यावरील आयसीयू जवळील भागात भंगार जमा करून ठेवल्याने उंदरांचा वावर वाढला आणि त्यामधून ही घटना घडली असून त्यामुळे पालिकेचे नाव बदनाम होत असल्याचे सांगत रवी राजा यांनी, तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, या घटनेला कारणीभूत ठरलेल्या खासगी कंत्राटदाराचे काम रद्द करण्याची मागणी रवी राजा यांनी केली.

घाटकोपर ( पूर्व) येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयू कक्षात मेंदूज्वर व लिव्हर या आजाराने त्रस्त श्रीनिवास यल्लपा (२४) हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार घेत असताना उंदराने त्याच्या डाव्या डोळ्याचा काही भाग कुरतडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे खळबळ उडाली.

साहजीकच या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी, सदर विषय उपस्थित करीत त्यास वाचा फोडली आणि पालिका प्रशासनाच्या आणि खासगी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, आयसीयू विभाग चालविणाऱ्या क्रीटीकेअर या कंत्राटदाराकडून आयसीयू विभाग पालिकेने आपल्या ताब्यात घेण्याची मागणी केली.

भाजपचे (BJP), भालचंद्र शिरसाट यांनी, या घटनेला कंत्राटदार व पालिका दोघेही जबाबदार असल्याचा आरोप केला. भाजपचे कमलेश यादव यांनी, पीडित रुग्णाला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

राजावाडी रुग्णालयातील आयसीयू विभाग हा तळमजल्यावर असून हा विभाग क्रिटीकेअर या कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्यात आलेला आहे. मुंबईतील इतरही काही रुग्णालयातील अतिदक्षता विभाग कंत्राटदाराकडून चालवले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here