@maharashtracity

नगरविकास मंत्र्यांचे आदेश; आमदार फारूक शाह

धुळे: महानगर पालिकेत (DMC) कचरा संकलनाच्या ठेक्यात आणि विविध कामांची बिले काढण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आ.फारुक शाह (MLA Faruk Shah) यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांच्याकडे केली. याबाबत मंत्री शिंदे यांनी तातडीने या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांना दिल्याची माहिती आ.शाह यांनी दिली.

याबाबत आ. फारुक शाह यांनी मंत्री शिंदेंना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शहराची लोकसंख्या अंदाजे ४ लाख असली तरी टाळेबंदीच्या काळात देखील धुळे महानगर पालिका क्षेत्रात २०० टन कचरा जमा झाल्याचा दावा कंपनीकडून केला जात होता. कचर्‍याचे वजन वाढावे, म्हणून या करारनाम्याचे उल्लंघन करून कचर्‍याचे वजन वाढविण्यासाठी घंटागाडीत कचर्‍याच्या ऐवजी रेती, माती, दगड भरले जात होते. याबाबतचे छायाचित्र व बातम्या विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. तरीही मनपा प्रशासनाने कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या पूर्वीच्या वॉटरग्रेस कंपनीवर कुठलीही कारवाई केली नाही. उलट धुळे महानगर पालिकेने दुसर्‍या एका स्वयंभू ट्रान्सपोर्ट नावाच्या कंपनीला दरात ६० टक्के वाढ करून कचरा संकलनाचा ठेका दिला आहे.

पूर्वीचे प्रतिटन दर ९१७ रुपये दर होते मात्र नविन दर १ हजार ६२५ रुपये प्रतिटन करण्यात आलेले आहे. साधारणत: प्रतिवर्ष १० टक्के दरवाढ अपेक्षित असतांना प्रशासनाने ठेका देतांना सुमारे ६० टक्के दरवाढ केलेली दिसते.

तसेच दि. २ मार्च २०२० पासून ते २९ मेपर्यंत धुळे मनपाच्या निधीतून काही पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून आर्थिक व्यवहार करत १० कोटी रुपयांची थकीत बिले अदा केली आहेत. देशासह राज्यात कोरोना महामारीला सर्वच नागरिक तोंड देत असतांना धुळे मनपाच्या निधीतून काही भ्रष्ट अधिकारी व पदाधिकारी ठेकेदारांची बिले अदा करण्यात व्यस्त होते.

त्यामुळे मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी आ. शाह यांनी केली होती. त्यानुसार मंत्री एकनाथ शिंदेंनी धुळे मनपातील मागील २ वर्षातील झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश नशिक विभागीय आयुक्तांना दिल्याची माहिती आ.शाह यांनी पत्रकान्वये दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here