डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे सर्व रिक्षा चालकांना मिळणार जीवनावश्यक अन्न-धान्य

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारला धान्य वाटपाचा महायज्ञ

कल्याण लोकसभा मतदारसंघात कम्युनिटी किचनद्वारे दररोज 50 हजार गरजू नागरिकांना फूड पॅकेट वाटप

कल्याण / ठाणे ( प्रतिनिधी ) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाँऊनमुळे आपला व्यवसाय बंद ठेवावा लागल्यामुळे घरी बसलेल्या निराधार रिक्षाचालकांच्या मदतीला स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे धावून आले आहेत. आज शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वळेकर , शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे नितीन नांदगावकर, रिक्षा संघटनेचे प्रमुख प्रकाश पेणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक 10 रिक्षा चालकांना धान्य पॅकेट वाटप करून आज या महायज्ञाला सुरुवात करण्यात आली. आजपासून पुढील सलग 10 दिवस शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व , मुंब्रा – कळवा, डोंबिवली पूर्व या सर्व 6 विधानसभा क्षेत्रात 55 हजार रिक्षाचालकांना धान्य पॅकेट पोहोचविण्यासाठी परिश्रम घेणार आहेत. सोबतच कल्याण पश्चिम, बदलापूर टिटवाळा आदि भागांतील रिक्षा चालकांना देखील याचे वाटप केले जाणार आहे.

दररोज काम करा , भाडं मिळवा आणि ठरलेली रक्कम मालकाच्या हाती टेकवून उर्वरित तुटपुंज्या रकमेत घर संसार चालविण्याची कसोटी रिक्षा चालकाला करावी लागते. कल्याण लोकसभा मतदारसंघात अशा प्रकारे हातावर पोट असणारा रिक्षा चालकांचा खूप मोठा वर्ग आहे. विशेषतः अंबरनाथ, डोंबिवली कल्याण या भागांत मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेले रिक्षा चालक लॉकडॉऊनमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. रिक्षा धंदा ठप्प त्यामुळे रोख पैशाची अडचण, साठवून ठेवलेली तुटपुंजी रक्कमही महिनाभरात संपली आणि घरातील होता – नव्हता तेवढा राशन – किराणामालही संपल्याने आता पोटाची भूक कशी भागविनार असा यक्षप्रश्न रिक्षा चालकांच्या आमच्यासमोर होता. खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले असून आता आमच्यासाठी अन्नदाता बनले आहेत अशी प्रतिक्रिया एका लाभार्थी रिक्षा चालकाने दिली.

दरम्यान , पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली महिनाभरापासून कल्याण लोकसभा मतदारसंघात कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज 50 हजार गरजू नागरिकांना फूड पॅकेट देखील पोहोचवत असल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली. या संकटाच्या काळात अविरत आणि अविश्रांत मेहनत घेणाऱ्या सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कौतुक केले. कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकल्यानंतर आरोग्यसेवा, अन्नदान सेवा, सफाई कर्मचारी सेवेत फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सर्वांचा विशेष सन्मान केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here