राजकीय पटलावर उलटसुलट चर्चा

Twitter : @maharashtracity

मुंबई

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच अजित पवार गटाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांची याआधी रविवारी भेट घेतली असताना सोमवारी पुन्हा तीच घटना घडल्याने राजकीय पटलावर उलटसुलट चर्चां सुरु झाल्या आहेत. दरम्यान, शरद पवार यांना अजित पवार हे भाजपाकडे वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा कयास लावला जात आहे. मात्र शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या दोन्ही भेटीनंतरही भाजपात सामील होण्याचे कोणतेही संकेत दिले नसल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा नेते अजित पवार भाजपसोबत जाऊन थेट उपमुख्यमंत्री झाले. राज्याच्या राजकीय क्षेत्रातील ही मोठी घटना होती. त्यात पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना ही उलथापालथ झाली. शिवाय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार यांनी आपले सर्व आमदार घेऊन विधीमंडळात प्रवेश केला. यातून संख्याबळ दाखवून दिले. असे असताना शरद पवार देखील भाजपात सामील होऊ दे, अशी इच्छा होऊन दोन दिवस त्यांची भेट घेणे सुरु असल्याचा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी यावर बोलताना संगीतले की, अजित पवार यांच्यासह विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार हे शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला गेले होते. तर रविवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आले होते. मात्र त्या दिवशी रविवार असल्यामुळे काही आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाचं अधिवेशनासाठी आलेले आणि रविवारी न आलेले आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शरद पवार यांनी म्हणणं ऐकून घेतले असले तरी त्यांच्या मनात काय आहे याबाबत काही सांगू शकत नाही, असेही पटेल यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी थेट मुद्याला हात घालत भाजपा सोबत आपण कधीही जाणार नसल्याचे शरद पवारांनी यांनी  या गटाकडे स्पष्ट केल्याचा दावा केला. आता सगळं संपलेलं असताना पवारांना पुन्हा पुन्हा भेटणे म्हणजे पवारांच्या चांगुलपणाचा फायदा घेणे, हे बरोबर नसल्याचे विद्या चव्हाण म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here