By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला यशस्वी ९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राज्यात ‘मोदी@९’ हे महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत बोलताना भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस सरकारच्या काळात स्कॅम होते तर मोदी सरकारच्या काळात स्कीम्स आहेत, हा या दोन सरकारमधील फरक आहे, असे प्रतिपादन सी. टी. रवी यांनी केले.
ते म्हणाले की, युपीए सरकार सत्तेत असताना अटकाना, लटकाना, भटकाना असे राजकारण चालायचे. मात्र आज तसे राजकारण नाही. आज मोदी सरकार प्रोऍक्टिव्ह आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी देशात ७४ विमानतळे होती. आज १४९ विमानतळे आहेत. ९ वर्षात १०० टक्के विमानतळे वाढवली आहेत. नवीन मेडिकल कॉलेज उभारली आहेत. अशा प्रगतीवर देश चालला असल्याचे ते म्हणाले. तसेच पहिला काळ होता त्या काळी प्रत्येक दिवशी स्कॅम व्हायचे. आज स्कॅम नाही केवळ स्कीम चालू आहे. जनतेला स्कीम मिळतेय. काँग्रेस काळात रोज वर्तमानपत्रात स्कॅमबाबत बातम्या यायच्या, असा घणाघातही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, देशाला सुपर पॉवर बनविण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात टीम काम करतेय. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यही सुरु आहे. राम मंदिर निर्माण, काशी कॉरिडॉर, उज्जैन महाकाल कॉरिडॉर, कर्नारपूर कॉरिडॉर, सोमनाथपूर कॉरिडॉर, अशी सांस्कृतिक कार्यही होत आहेत. स्वातंत्र्य सैनिकांची स्मारकेही बनविली आहेत. काँग्रेस काळात स्वातंत्र्य सैनिकांना न्याय मिळाला नव्हता.
ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकार आल्यावर सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांनाही न्याय मिळाला आहे. तसेच मन की बात द्वारे प्रत्येक महिन्याच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणादायी गोष्टी ऐकतो. त्यात राजकारण नसते. केवळ देशात, जगात काय चालले आहे ते पंतप्रधान मोदी मन की बातद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात, असेही सी. टी. रवी. म्हणाले.
या अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, हे अभियान एवढ्यासाठी आहे की आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता लाभला. ९ वर्षात आपल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर रोषण करण्याचे काम मोदी यांनी केले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे ९ वर्षाची कारकीर्द जनतेसमोर नीट जावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेली विकासकामे, केलेले प्रकल्प, योजना, विविध समाज घटकांसाठी केलेली कामं ही तळागाळापर्यंत पोहोचावी म्हणून हे अभियान देशभर सुरु आहे.
आज सर्व देश पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. यात पंतप्रधान मोदींचे अपारकष्ट आहेत. म्हणून आज जो वर्ग नेहमी भाजपाच्या मागे उभा राहिलाय किंबहुना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, नेतृत्व केल्यानंतर समाजातील जो बुद्धीजीवी वर्ग आहे तो मोदींच्या नेतृत्वावर प्रभावित आहे. त्यामुळे जनतेचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम देशभर पक्षाच्यावतीने सुरु आहे.