By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केला. भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला ओबीसी समाजाची निवडणुकीपूर्वी आठवण आली असून, राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर ही केवळ नौंटकी आहे. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी खोटे प्रेम उतू येत आहे, असे सांगतानाच, भाजपाने देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून प्रथमच ओबीसी समाजाला न्याय दिला. त्यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा प्रदान केला. केंद्रात ओबीसी समाजाचे २७ मंत्री आहेत. महाराष्ट्रात प्रथमच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींचे मंत्रालय स्थापन करून राज्यातील ओबीसींना न्याय दिला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर इम्पेरिकल डेटाचे नियोजन करून ओबीसींना न्याय मिळवून दिला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

महाविकास आघाडी सरकार असताना ओबीसींना न्याय मिळू शकत नाही या कारणावरून तत्कालीन ओबीसी आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत इम्पिरिकल डेटासाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आता ढोंग करत आहे. भाजपवर खोटे आरोप करत आहेत, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

ओबीसींसाठी काम करणारा खरा पक्ष भाजपाच

बावनकुळे म्हणाले, भाजपाने आतापर्यंत ओबीसींना जिल्हा परिषद, आमदार, मंत्री, पालकमंत्री यासारखी पदे दिली, त्यावेळी अन्याय झाला नाही का? त्यानंतर पक्षाने मला महासचिव व आता प्रदेशाचे अध्यक्ष केले, भाजपाने माझ्यावर किंवा ओबीसींवर कधीही अन्याय केला नाही. याउलट, मविआ सरकारने महाज्योतीचे पैसे थांबविले, इम्पेरिकल डेटासाठी निधी नाकारला, हा ओबीसींवर अन्याय नाही का? ओबीसींसाठी काम करणारा खरा पक्ष भाजपाच आहे, असाही दावा त्यांनी केला.

ओबीसी जनगणनेची संविधानात तरतूद नाही

ओबीसींची जनगणना करण्याची तरतूद संविधानात नाही, बिहारमध्ये ओबीसींची जनगणना करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने असे करता येणार नाही असा निर्णय दिला. त्यासाठी संविधानात सुधारणा करावी लागणार आहे. युपीए सरकारच्या काळात जातनिहाय जनगणना करण्यात केवळ महाराष्ट्रात लाखो चुका झाल्या होत्या, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

काय म्हणाले बावनकुळे?

• राममंदिर हे भारतीयांच्या हृदयातील श्रद्धास्थान

• मविआमध्ये मुख्यमंत्री पदाचे २५ दावेदार

• पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या नेत्या

• खडसे यांनी आम्हाला शिकविण्याची गरज नाही

• देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना ७ खात्याचे मंत्री केले होते

• शिंदे-फडणवीस सरकारमध्ये योग्य समन्वय

• मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here