@maharashtracity

धुळे: शास्तीमाफि योजनेतून करोेडो रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याने खोटी बिले काढण्यासाठी आता सत्ताधार्‍यांची धावपळ सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणजे ९४ लाख रुपयांच्या बांबू घोटाळ्याचे बिल काढण्याचा मुद्दा स्थायी समिती सभेतील विषय पत्रिकेत घेण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरुवार दि ५ ऑगस्ट रोजी स्थायी समितीची सभा आहे. या सभेत विषय क्र.१०६ हा बाधीत क्षेत्रातील ९४ लाख रुपयांच्या बांबु घोटाळ्याचा आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मंडप डेकोरेटर्स मालकाने मनपाच्या आदेशान्वये प्रतिबंधीत क्षेत्रात बांबूचे कठडे लावले होते. यानंतर मंडप डेकोरेटर्स मालकाने या कामाचे ९४ लाख रुपयांचे बिल मनपात सादर केले. या विषयाबाबत १ एप्रिलच्या स्थायी सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी बांबू बिलात भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला होता. त्यासाठी नगरसेवकांनी सभागृहात बांबु आणून प्रतिकात्मक आंदोलन केले होते. यामुळे त्यावेळी हा विषय स्थगित ठेवण्यात आला होता.

मात्र मनपाच्या तिजोरीचे लचके तोेडणार्‍या सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने आज होणार्‍या स्थायी समितीच्या सभेत हा विषय पुन्हा घेतला आहे, असे सेनेने पत्रात नमूद केले आहे.

शास्ती माफी योजनेतून मनपाच्या तिजोरीत तब्बल ४ कोटी १७ लाख रुपये जमा झाले आहेत. त्या रक्कमेवर डोळा ठेवून बांबुच्या बिलाचा विषय पुढे आणण्यात आला आहे. आजच्या सभेत कदाचित ज्या सत्ताधारी नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा दावा केला होता ते पक्षाच्या दबावामुळेे गैरहजर राहु शकतात किंवा मुकाट्याने विषयाला मंजुरी देवू शकतात.

त्यामुळे महापालिका आयुक्त म्हणून हा विषय रद्द करावा अन्यथा सेना लढा उभारेल, असा इशारा महानगर प्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, डॉ.सुशिल महाजन, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळेे, संजय वाल्हे, गुलाब माळी, कुणाल कानकाटे, प्रविण साळवे, प्रकाश शिंदे, भटू गवळी, समाधान शेलार, सचिन बडगुजर,पुरुषोत्तम जाधव, संदीप चव्हाण, पंकज भारस्कर, संजय जवराज यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here