मुंबई काँग्रेसची धुरा महिलेच्या हाती

By  Santosh More 

Twitter: @maharashtracity

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची हकालपट्टी करत नवीन अध्यक्षपदाची धुरा माजी मंत्री तथा आमदार डॉ. वर्षा गायकवाड यांच्या हातात देण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी या नियुक्तीची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड या  मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिवंगत एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगी कॉँग्रेसच्या एखाद्या विभागाच्या किंवा शहराचे अध्यक्ष होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी कशाप्रकारे दूर करायची हे वर्षा गायकवाड यांच्यापुढील मोठे आव्हान असणार आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा होती. मुंबई अध्यक्ष पदाकरिता मुंबईतून अनेक नावे चर्चेत होती. नसीम आरिफ खान, चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार संजय निरुपम यांच्या नावाची देखील चर्चा होती.  मात्र काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाची जबाबदारी दिली आहे. मावळते अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसमध्ये असलेल्या नाराजीच्या अनेक तक्रारी पक्ष श्रेष्ठींकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी पाहता आज भाई जगताप यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पद सांभाळल्यापासून पक्ष कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्यात आणि सत्ताधारी भाजप – शिंदे सरकार विरोधात हल्लाबोल करण्यात भाई जगताप अयशस्वी ठरले होते.    

मुंबई महानगरपालिका आणि लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये हा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी मतदार संघातून अनेकदा निवडून आल्या  आहेत. तसेच त्या मंत्री देखील राहिल्या आहेत. वर्षा गायकवाड या दलित समाजातील दलित मतदारांना आकर्षित  करण्यासाठी काँग्रेसने ही नियुक्ती केली असल्याचे बोलले जात आहे.  तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात मिळाली आहे. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे असल्यामुळे या गटाकडून हा मतदारसंघ कॉँग्रेसला सोडण्यात येणार नसल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची देखील शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here