महाराष्ट्र मंदिर महासंघाची महत्त्वपूर्ण घोषणा !

By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 18 मंदिरांचा समावेश झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. 9 जून या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबईमधील श्री शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जीवदानी मंदिराचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, कडाव गणपती मंदिराचे विश्वस्त (कर्जत) विनायक उपाध्ये, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर हे उपस्थित होते. वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार्‍या मंदिरांच्या नावांची घोषणा या वेळी सुनील घनवट यांनी केली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 7 जून या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या ट्रस्टींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करण्याचा ठराव एकमताने संमत केला. वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली. यामध्ये ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे कपडे यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही वस्त्रसंहिता लागू करण्यामागे जनमानसांत शासकीय प्रतिमा बिघडू नये, हा सरकारचा हेतू होता. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याप्रमाणे मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे घनवट यांनी म्हटले.

काहीजण मंदिरांमध्ये अंगप्रदर्शन करणारी उत्तेजक, अशोभनीय, असभ्य, फाटलेल्या जीन्स आणि तोकड्या कपड्यांमध्ये येतात. सात्त्विक वेशभूषा परिधान करून मंदिरात आल्यावर भक्तांना मंदिरातील चैतन्याचा लाभ होतो, तसेच मंदिरातील पावित्र्य, मांगल्य, परंपरा आणि संस्कृती टिकून रहाते, अशी हिंदू धर्माची शिकवण आहे. यासाठीच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. हा केवळ प्रारंभ आहे. भविष्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील आणखीही काही मंदिरे वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे जीएसबी टेंम्पल ट्रस्टचे मानद चिटणीस आणि कायम विश्वस्त शशांक गुळगुळे यांनी सांगितले.

आतापर्यंत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, अंमळनेर येथील श्रीदेव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह ‘बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस’ आणि ‘सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी मंदिरामध्ये सात्विक पोषाख परिधान केल्यामुळे मंदिरातील पावित्र्याचा लाभ होत असल्याचे म्हटले.

या वेळी जीएसबी टेंम्पल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर, खजिनदार कल्पना प्रभू, श्री शीतलादेवी आणि मुरलीधर देवस्थान यांचे पालक विश्वस्त अनिल परूळकर, श्री भुलेश्वर आणि श्री बालाजी रामजी देवस्थानचे पालक विश्वस्त दीपक वालावलकर, माहीम येथील श्री दत्त मंदिराचे पुजारी किशोर सारंगुल, श्री वाळकेश्वर मंदिराचे पदाधिकारी पंकज सोलंकी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here