Twitter : @milindmane70

मुंबई

राज्यात शिंदे – फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील सर्वच खासदार, आमदार सत्ताधारी पक्षात गेल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प, आरोग्य, रस्ते, वीज व पाणी व मच्छीमार बांधवांच्या प्रश्नापासून ते दरडग्रस्त भागातील नागरिकांचे प्रश्न आता संपुष्टात येणार का? असा सवाल रायगड जिल्ह्यातील तमाम जनता विचारत आहे.

राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारमध्ये भाजपा व शिवसेना बंडखोर गटातील आमदारांचा यापूर्वी समावेश होता. मात्र आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा शिंदे – फडणवीस सरकारमधील सत्तेत सामील झाल्याने रायगड जिल्ह्यातील राजकारणाला नव्याने कलाटणी मिळाली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात आता विरोधक आमदार शिल्लक नाही. सगळेच सत्ताधारी गटात असल्याने रायगडच्या विकासाला आता चालना मिळणार का? असा प्रश्न रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील जनता या सत्ताधारी पक्षातील खासदार व आमदारांना विचारीत आहे.

रायगड जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ असून त्यात रायगड लोकसभा मतदारसंघ हा रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघ देखील रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघात समाविष्ट आहे. जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग व महाड हे तीन मतदारसंघ पूर्वीचे शिवसेनेचे बालकिल्ले होते. परंतु हे आमदार आता शिंदे बंडखोर गटात गेले असून ते सत्तेमध्ये समाविष्ट आहेत. तर यापूर्वी महाविकास आघाडी सरकारनंतर भाजपामधील उरण, पनवेल व पेण हे तीन मतदारसंघ भाजपा प्रणित आमदारांकडे आहेत. एकमेव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती सुनील तटकरे या शिंदे – फडणवीस सरकारमधील राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्यांचा सरकारमध्ये समावेश झाला आहे. त्याच पद्धतीने मावळ लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना बंडखोर गटाचे खासदार असून ते देखील सत्ताधारी पक्षात आहेत. तर एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे हे देखील सत्तेत सामील आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये उरण, पनवेल व पेण हे तीन भाजपचे आमदार विरोधी गटात होते, तर महाड, कर्जत, खालापूर व अलिबाग व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेल्या आदिती सुनील तटकरे यादेखील महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेमध्ये सामील होत्या. आता रायगड जिल्ह्यात नव्याने सरकारमध्ये सामील असलेल्या आदिती तटकरे यांच्यामुळे रायगड जिल्ह्यात एकही विरोधी पक्षाचा आमदार शिल्लक राहिलेला नाही.

रायगड जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने विरोधी पक्षात कोण व सत्ताधारी कोण याचा अंदाज ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मात्र अद्याप आलेला नाही. राज्यातील खासदार व आमदार हे निवडून दिल्यानंतर त्यांच्या मनाच्या मर्जीप्रमाणे मूळ पक्ष सोडून स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यात विकासाच्या नावाने बोंबा असल्याचे विदारक चित्र रायगड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील रखडलेला मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चा प्रश्न तब्बल बारा वर्षे प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ही देखील पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यातील पाणी व्यवस्थेचे देखील तीन तेरा वाजले आहेत. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे. या सर्व योजना मूळ ठेकेदाराऐवजी उपठेकेदार करीत असल्याने या योजनांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून केंद्र सरकारचा व राज्य शासनाचा पैसा पावसाळ्यातील पाण्यात पूर्णपणे वाहून गेला आहे.

राज्यात मागील दोन वर्षाचा कोविडचा काळ बघता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व त्यानंतर दीड वर्षाचा शिंदे – फडणवीस सरकारचा कार्यभार पाहता रायगड जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नाबाबत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. ज्याप्रमाणे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न भिजत पडलेला आहे, त्याच पद्धतीने रायगडातील मच्छीमार बांधवांचा प्रश्न, दरडप्रवण भागातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न व रायगड जिल्ह्यातील रखडलेले पाटबंधारे व छोटे व मध्यम लघु पाटबंधारे प्रकल्प, हे सर्वच प्रश्न मागील पाच वर्षापासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे व सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे रखडलेले असताना रायगड जिल्ह्यातील खासदार व आमदार हे मात्र सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त आहे. मी मंत्री कसा होईल, मी लाल दिव्याच्या गाडीत कसा फिरेन, हाच रायगड जिल्ह्यातील आमदार व खासदारांना पडलेला गहन प्रश्न आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र या निमित्ताने संपूर्ण रायगड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here