मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

@maharashtracity

मुंबई: घाटकोपर येथील एन वॉर्ड येथील ’पालकमंत्री आपल्या दारी‘ हा उपक्रम सुरू असताना स्थानिक नागरिक पूनम नायर यांनी लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मिळत नसल्याने तत्काळ उपचार मिळत नसल्याची तक्रार केली होती. यावेळी लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात सरकारच्या धर्तीवर ’खिलखीलाहट‘ रुग्णवाहिका (Khilkhillahat ambulance) सुरू करणार असल्याची ग्वाही मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी गुरुवारी दिली. गुजरात सरकारने लहान मुलांसाठी खिलखीलाहट ही रुग्णवाहिका योजना केली सुरू असून त्याच धर्तीवर मुंबई उपनगर परिसरात अशी रुग्णवाहिका सुरू करणार असल्याचे लोढा म्हणाले.

दरम्यानर ’पालकमंत्री आपल्या दारी‘ या उपकमातून १०२ अर्जदारांनी प्रत्यक्ष तक्रारी मांडल्या. यावेळी मेट्रो पुलाच्या खालील पार्किंग हटवणे, अनधिकृत दुकाने यांच्यावर कारवाई करणे, नाल्यांचे खोलीकरण, म्हाडा, रस्ते दुरुस्ती, रस्ते रुंदीकरण, पाणी कमी दाबाने येणे, छत्रपती शिवाजी मैदान येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने केलेले खोदकाम पूर्ववत करून पार्क सुस्थितीत करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सभासदांना विश्वासात न घेता कार्यकारी मंडळ यांचा मनमानी कारभार, ड्रेनेजमुळे निर्माण झालेल्या समस्यावर तोडगा काढणे, म्हाडा यासह १७० विविध विषयांवर अर्ज आले होते. त्यापैकी १०२ अर्जदारांनी प्रत्यक्ष आपल्या तक्रारी मांडल्या.

पालकमंत्री लोढा यांनी सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी खासदार मनोज कोटक ,आमदार पराग शहा, एन वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे, अपर जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपायुक्त देविदास क्षीरसागर, यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here