@maharashtracity

मुंबई: परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Mumbai Veterinary college) जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीकडून मुंबईतील पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना प्राण्यांबाबत जागृती करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी लहानपणीच ऐकलेले कायदे नियम पुढे अनुकरणीय होत असल्याने प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास मुंबई शहर जिल्हाधिकारी तसेच प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर (Collector Rajeev Nivatkar) यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी निवतकर पुढे म्हणाले की, प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची (The Prevention of Cruelty to Animal Act) जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येत असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यानिमित्त मुंबई शहरातील विविध शाळांत मुलांमध्ये प्राण्यांविषयी जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचा भविष्यात सकारात्मक परिणाम दिसेल. प्राण्यांवर दया करण्याविषयी केलेली चित्रफित पाहून मुले त्याचे अनुकरण करतील.

डॉ. रानडे यांनी मनुष्याच्या सानिध्यात राहणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व सांगितले. महानगर पालिकेच्या शाळेत (BMC schools) अशाप्रकारे साजरा करण्यात आलेला हा राज्यातील पहिला जनजागृती कार्यक्रम असून यातून विद्यार्थ्यांना प्राण्यांचे अधिकार व प्राण्यांविषयक कायद्यांची माहिती देणाऱ्या प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयतर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक व सन्मानपत्र वितरित करण्यात आले.

यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित रानडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे, महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाचे डॉ. कलीमपाशा पठाण तसेच वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग या संस्थेचे अबोध अरास, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव डॉ. शैलेश पेठे, मुंबई महापालिकेचे अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here