@maharashtracity

शिवसेनेचे रोखठोक प्रत्युत्तर

मुंबई: मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी आणि महापालिका, वैधानिक समित्यांच्या बैठका प्रत्यक्ष घेण्याच्या मागणीसाठी पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. (BJP protested against corruption in BMC)

कोरोनाच्या नावाखाली सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) पक्ष महापालिका सभा, वैधानिक व विशेष समित्यांच्या सभा प्रत्यक्ष न घेता आभासी (ऑनलाईन) स्वरूपात जाणीवपूर्वक घेत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष हे पालिकेची सभा, स्थायी समिती सभा, बेस्ट समिती बैठक प्रत्यक्षात घ्यावी आणि लसीचे दोन डोस घेतलेल्या पत्रकारांनाही सभागृहात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी केली आहे.

कोरोनाच्या नावाखाली आभासी सभा घेऊन सत्ताधारी शिवसेना पक्ष रस्त्यांच्या निविदात घोटाळा, बेस्ट डिजिटल तिकीट निविदामधील घोटाळा, आश्रय योजनेतील घोटाळा, पूर नियंत्रण निविदेतील घोटाळा, एसटीपी घोटाळा, कचरा घोटाळा करीत आहे. महत्वाच्या विषयांवर भाजप नगरसेवकांना आभासी सभेतसुद्धा बोलू दिले जात नाही, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

सरकारी नियमांनुसार बैठका -: महापौर

पालिकेच्या सभांमध्ये नगरसेवकांना बोलायला मिळत नाही. यासाठी आम्हीसुद्धा प्रत्यक्ष सभा घ्याव्यात या मताचे आहोत. राज्य सरकारकडे आम्ही पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट आणि मुंबईमध्ये वाढणारे रुग्ण पाहता सरकार जे काही आदेश देईल त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी सांगितले.

भाजपकडून फक्त राजकारण -: यशवंत जाधव

भाजपच्या हातातून राज्यातील सत्ता गेली आहे. महापालिकेतही त्यांना सत्तेचा वाटा मिळालेला नाही. त्यामुळे भाजपवाले काहीसे सैरभैर झाले आहेत. त्यांच्याकडे जनहिताचे मुद्दे नाहीत. त्यामुळे भाजपवाले उठसूट कोणत्याही विषयावर आंदोलन करीत केवळ राजकारण करीत आहे, असा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing committee Chairman Yashwant Jadhav) यांनी केला आहे.

भाजपाला फक्त राजकारण करायचे असते. सध्या मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून पालिका आयुक्त आहेत. पालिका आयुक्तांनी सरकारकडे पत्रव्यवहार करायला हवा.

आयुक्तांकडे भाजपावाले जात नाहीत. त्यांना त्यांची कामे करून घेण्यासाठी आयुक्त लागतात. त्यासाठी आयुक्तांबरोबर नाराजी नको म्हणून महापौरांकडे आंदोलन केली जात आहेत. आम्ही सत्ताधारी म्हणून प्रत्यक्ष सभा घेण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here