@maharashtracity

भाजप खासदारांसह नगरसेवकांविरुध्द आ.फारुक शाह यांचा घणाघात

धुळे: खासदारांनी आठ वर्षात काय दिवे लावले? कुठली विकास कामे त्यांनी केलीत? महापालिकेत भाजपची सत्ता असताना सर्वच भाजपचे नगरसेवक हे ठेकेदारीत गुंतले आहेत. महापालिकेतील भाजपा सत्ताधार्‍यांनी या स्वच्छतेच्या नावाखाली तिजोरीच स्वच्छ करुन टाकली, असा घणाघात आमदार फारुक शाह यांनी पत्रकार परिषदेतून केला.

धुळे शहातील संतोषी माता मंदिरानजीकच्या शासकीय विश्रामगृहात आ.डॉ.शाह यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपावर जोरदार हल्ला चढविला. कोरोना काळात मी घरात लपुन बसलो नाही. या काळात मी लोकांना काम करुन दाखविले. हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात व्ही.डी.आर.एल प्रयोगशाळा स्थापन केली.

आमदार म्हणाले, माझे लक्ष्य शहर विकास आणि जनतेच्या समस्यांवर आहे. माझ्या कार्यालयात सट्टा किंग, वाळू माफिया नव्हे तर गोरगरीब येतात. ते सामान्यपणे रेशनच्या अन्नधान्याची तक्रार करतात. त्यामुळेच मी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे जावून सहा हजार कुटूंबांसाठी रेशनचा कोटा वाढविला. 200 दिव्यांगाना पिवळे रेशनकार्ड मिळवून दिले. शेकडो दिव्यांगांना सायकलीचे वाटपही केले. साक्री रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महिनाभरात होईल, असेही त्यांनी सांगितले.

एकीकडे मी विकास कामे करीत असताना महासभेत मात्र सत्ताधारी भाजपाने राजकारण करुन विकासकामांना खिळ घातला. नदीसंवर्धनाबाबत मी मंत्र्यांकडे प्रस्ताव घेवून गेलो. त्यांनी होकार दिला. त्यानंतर शासनाकडून माला पत्रंही पात्र झाले आहे. मात्र भाजपवाले खासदारांना श्रेय देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप फारुख शाह यांनी केला.

खासदारांनी आठ वर्षात काय दिवे लावले हे त्यांना विचारले पाहिजे. केंद्रात मंत्री असताना जनतेसाठी काय केले. संसदेत पाच मिनिटे भाषण ठोकून स्वतःची पाठ थोपटून घेतली. रेल्वे मार्गाचे काय झाले. ऑक्सीजन प्लांटसाठी मी निधी दिल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांचा ऑक्सीजन प्लांट सध्या आहेे कुठे हे त्यांना विचारले पाहिजे, असे प्रश्न त्यांनी उपस्थिती करत खासदारांवर तोफ डागली.

पंतप्रधान म्हणतात स्वच्छ भारत झाला पाहिजे. धुळ्यात महापालिकेतील भाजपा सत्ताधार्‍यांनी या स्वच्छतेच्या नावाखाली तिजोरीच स्वच्छ करुन टाकली. आदिवासींंच्या समाज भवनासाठी 11 कोटी तर वस्तीगृहासाठी साडेपाच कोटी, बुुध्द विहारासाठी सहा कोटींचा निधी मंजुर झाला आहे. विद्युत शवदाहिनीचे काम देखील आता प्रगतीपथावर आहे.

एखाद्या शहरात 50 टक्के जनता उर्दू भाषिक असेल तर त्यांच्यासाठी उर्दू घर बांधण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यानुसार मी प्रस्ताव पाठविला. त्यांनी मान्यताही दिली. मात्र महासभेत सुपारी बहादर नगरसेवकांनी हरकत घेतली. मालेेगावमध्ये भाजपानेच उर्दू घर बांधले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा निधी दिला हे आता त्यांनाच विचारा.

देवपूरसह शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. डांबरीकरण केलेले रस्ते दोन-तीन वर्षात उखडतात त्यामुळे मी रस्ते कॉक्रीट करायचे ठरवले. त्यामुळे डांबरांचे प्लांट असलेल्या ठेकेदारांचे पित्त खवळले त्यातूनच मला विरोध झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here