खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By Anant Nalavade

Twitter : @NalavadeAnant

मुंबई: कोविड काळात सर्वसामान्य नागरिक जीव वाचवण्यासाठी आटापीटा करत असताना मुंबई महापालिकेत मात्र त्यांना लुटण्याचे काम होत होते. कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग ठाण्यात अवघ्या ३५० रुपयांना मिळत असताना त्याच बॅगेसाठी मुंबई महापालिका तब्बल ६ हजार ७०० रुपये का मोजत होती, असा प्रश्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेची ओळख आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट महापालिका अशी उध्दव ठाकरेंच्या १५ वर्षांच्या कालावधीत झाल्याचाही आरोप त्यांनी केला. कोविंड काळात एकीकडे माणसे मरत असताना हे मात्र त्यांना लुटायचे काम करत होते, १५ वर्ष उध्दव ठाकरेंच्या ताब्यात महापालिका असतानाही मुंबईकरांच्या, मराठी माणसांच्या आयुष्यात फारसे बदल घडलेले दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याऐवजी आधी आपल्या १५ वर्षांच्या कार्यकालाचे उत्तर जनतेला द्यावे अशी मागणी करतानाच, आमच्यावर खोके खोके असा आरोप करणाऱ्यांनी कुणाला किती खोके मिळाले हे लवकरच एसआयटीच्या चौकशीतून समोर येईल, हे विसरु नये असा इशाराही त्यांनी दिला. ईडीच्या चौकशीत आता सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांचे धागेदोरे कुणापर्यंत गेले आहेत हे स्पष्ट होईल असेही सूचक विधान त्यांनी केले.

उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत सत्ता असताना मराठी माणसांना, शिवसैनिकांना काय मिळाले याचा विचार करण्याची वेळ आली असून मराठी माणसांना मुंबई सोडून ठाणे, कल्याण डोंबिवली जावे लागत आहेत. त्यासाठी उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे हेच कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here