By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
मुंबई: बीआरएस पक्ष ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्यातील जनता मुर्ख नाही. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा असा ताफा आल्याने काही फरक पडणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तेलंगणा मुख्यमंत्री केसीआर यांना फटकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधला. बीआरएस पक्षाच्या घोषवाक्यात ‘अब की बार किसान सरकार, अब की बार दलित सरकार’ असा उल्लेख आहे. मात्र किसान म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे महाविकास आघाडी. त्यामुळे बीआरएस पक्ष दलित मते कापण्याचा प्रयत्न करणार आहे. या वर्गात वेगवेगळे गट असले तरी आता दलित वस्त्यांमध्ये एकता पाहायला मिळतेय. आजचे सुशिक्षित तरूण संविधान आणि आरक्षणावर डॉ. आंबेडकरांविषयी सकारात्मक भूमिका मांडत आहेत. मंडल आयोगाचा राजकीय स्वीकार करणारा पहिला माणूस ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे मनातील स्वप्न पूर्ण केले ते शरद पवार होते याची आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रेम पाहायचे असेल तर सर्वात उत्तम उदाहरण मी स्वत: आहे, असे सांगतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपने आयत्या वेळी तिकीट कापले. राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो. तुम्हाला साधं तिकीट दिलं नाही. त्यामुळे जातीपातीचे खालच्या दर्जाचे राजकारण कोणी करू नये, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी भाजपने केलेल्या टिकेवर दिला.