काळी फित बांधून आघाडीकडून निषेध
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: मोदी आडनावावरून केलेल्या उपहासात्मक टिकेमुळे सुरत न्यायालयाने मानहानीचा खटल्यात दोषी ठरवलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. या निर्णयाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.
त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र जमून भाजप आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार काळ्या फिती लावून सभागृहात बसले होते.
विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषण झाल्यानंतर नाना पटोले यांनी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. हुकूमशाही व्यवस्थेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा दुर्दैवी असून तो लोकशाही विरोधी असल्याची टीकाही पटोले यांनी केली. या निर्णयाच्या निषेधार्थ आम्ही सभात्याग करत असल्याचे पटोले यांनी जाहीर केले. या निर्णयानंतर काही वेळाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार काळी फीत बांधून सभागृहात आले.