प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP Spokesperson Mahesh Tapase) यांनी गुरुवारी येथे उपस्थित केला.

महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी नुकताच प्रसार माध्यमांसमोर केला. त्यावर बोलताना तपासे यांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) परमेश्वर दीर्घायुष्य देवो. परंतु,ज्या पद्धतीने केसरकर यांनी बंडाबाबत काही गोष्टींचा खुलासा केला व बंड अयशस्वी झाल्यास काय झाले असते असे सांगितले, त्यातून स्वाभाविकच काही प्रश्न निर्माण होतात असेही तपासे यांनी यावेळी नमूद केले.

एकेकाळी अमर्यादित असे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेमध्ये (Shiv Sena) होते. ते ठरवतील ती पूर्व दिशा, एवढा मान उध्दव ठाकरे कुटुंबाने दिला होता, याची आठवण करून देत, आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसून देखील भाजपच्या (BJP) इशाऱ्यावर चालावे लागते आहे ही शोकांतिका आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ( Lok Sabha and Assembly elections) किती जागा शिंदे गटाला मिळतील याबाबत शिंदेंच्या आमदारांना व खासदारांनाच खात्री नाही असेही तपासे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पूर्णपणे असहकार्याची भूमिका घेतली असून दुसरीकडे शिंदे गटाने ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी ठळक जाहिरात वर्तमानपत्रात करुन भाजपला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशीच जाहिरातीचा मजकूर बदलवून घ्यावा लागला इतका दबाव भाजपने मुख्यमंत्र्यांवर आणल्याचे चित्र होते, याकडेही तपासे यांनी लक्ष वेधले.

मंत्रिमंडळाचा विस्तार असो की इतर कुठल्याही महत्वपूर्ण बाबींचे निर्णय असो, तेथे केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना निर्णय घेता येऊ शकत नाही हे सध्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असा टोला लगावतानाच, बंडाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मनावर नक्कीच दडपण असू शकेल. परंतु त्यापेक्षा मोठा दबाव आज भाजपचा आहे हे कोणी नाकारू शकत नाही, असेही तपासे यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here