@vivekbhavsar

मुंबई: राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुमारे अडीच तास चर्चा केली आणि गेल्या काही दिवसांपासून तापत असलेले राजकीय वातावरण अधिकच गरम झाले.

पवार यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच पवार यांचे बंधू राजेंद्र यांचे पुत्र आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हेदेखील या चर्चेच्या वेळी उपस्थित असल्याने अनेक तर्क-वितर्क सुरू झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या स्थापना दिनाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या या भेटीमागे अनेक कंगोरे असावेत, असा जाणकारांचा अंदाज आहे. महाराष्ट्र विकास आघाडी कायम राहणार असून पुढील विधानसभा निवडणूकदेखील आपण एकत्रच लढवणार आहोत, असे पवार यांनी 10 जूनला पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. मात्र, किशोर यांची आजवरची वाटचाल पाहता पवार यांच्या मनात आघाडीऐवजी अन्य काही विचार घोळत आहेत का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रशांत किशोर यांनी कायम एका पक्षासाठी काम केले आहे. त्यांनी कधीही कोणत्याही आघाडीला आपल्या कल्पना सांगितल्या नाहीत. भाजपा, संयुक्त जनता दल, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि अगदी शिवसेनेलाही त्यांनी एकच सल्ला दिला होता, ‘एकला चालो रे’. कोणाचीही मदत न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढा मग यश तुमचेच असेल, हा त्या सल्ल्याचा गाभा होता. त्यांचा सल्ला ऐकणारे सत्तेत आले, हीदेखील वस्तुस्थिती आहे.

प्रशांत किशोर यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला असला, तरी त्यावर विश्वास ठेवायला राजकीय जाणकार तयार नाहीत. भाजपाला 2014 मध्ये अभूतपूर्व यश मिळवून देण्यात मोठा सहभाग असला तरी त्या पक्षाने आपल्याला खड्यासारखे दूर सारले, याची प्रशांत किशोर यांच्या मनात भळभळती जखम आहे. यापुढे राजकीय व्यूहरचना करण्याचे काम करणार नाही असे त्यांनी जाहीर केले असले तरी भाजपाचे अधिकाधिक राजकीय नुकसान करण्याची एकही संधी ते सोडणार नाहीत. भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्यात प्रशांत किशोर पुढाकार घेत आहेत, असे दिसत आहे. त्यांना राजकीय महत्वकांक्षा असेल तर कदाचित 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सक्षम चेहरा म्हणून ते पुढे येऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांना सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा असेल.

या शक्यता नाहीच
शरद पवार यांच्या पेक्षा राजकीय मुत्सद्दी नेता कोण असू शकतो? त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रशांत किशोर यांचा सल्ला घेण्याची गरजच नाही.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्यस्थ म्हणून प्रशांत आले असावेत – ही चर्चाच चुकीची आहे. तसा काही प्रयोग करायचा झालाच तर मोदी थेट पवार यांना फोन करून बोलू शकतील. त्यासाठी दोघांना कोणा मध्यस्थाची गरज नाही.

सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात प्रमोट करणे… पुन्हा तेच.. त्यासाठी प्रशांत यांची गरज नाही.

राष्ट्रवादीने एकट्याने लढावे असा सल्ला देण्यासाठी प्रशांत भेटले असावे. – हा निर्णय पावरच घेऊ शकतात आणि त्यासाठी ते कोणाचाही सल्ला घेणार नाहीत.

आपणच स्थापन केलेले सरकार मुदतीआधी पाडून पवार आता या वयात स्वतःची बदनामी ओढून घेणार नाहीत. त्यामुळे भाजप कितीही मुहूर्त जाहीर करत राहिले तरी शरद पवार आहेत तोपयंत या सरकारला धोका नसेल, मग प्रशांत किशोर असो की अन्य कोणी भेट घेऊ देत, या सरकारच्या स्थैर्यावर आता तरी फरक पडणार नाही, असे म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here