@maharashtracity

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशसह अन्य पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पार्टीसोबत आघाडी करून काही जागा सोडाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला शह देण्यासाठी रिपाईच्या आघाडीची कशी गरज आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

कोरोना नियंत्रणात आला तर फेब्रुवारी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक (Assembly election) होतील. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि रिपाइंचे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर उपस्थित होते.

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे, असे आठवले यांनी नड्डा यांना सुचवले.

उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले आहे. उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने (बसपा) त्यांच्याकडे वळविला आहे. बसपकडे (BSP) गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे घ्यायचा आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरपीआयला (RPI) भाजपने (BJP) सोबत घ्यावे. भाजप – आरपीआय युती करावी, अशी मागणी आठवले यांनी नड्डा यांच्याकडे केली.

अन्य राज्यांमध्ये आरपीआयचे युनिट मजबूत आहे. त्या राज्यांमध्ये काही जागा भाजपने आरपीआयला देऊन युती करावी. भाजप हा आरपीआयचा घटक पक्ष आहे. भाजपसोबत राष्ट्रीय पातळीवर आरपीआयची युती मजबूत आहे. मात्र प्रदेश स्तरावर विधानसभा निवडणुकीत आरपीआयला जागा देऊन युती करावी, आदी मुद्द्यावर रामदास आठवले यांनी जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here