@maharashtracity
पुणे: ‘कोरोना’ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.
अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या आवारामध्ये पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या बाणेर रोड व पाषाण रोड येथील दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले.

अजित पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल नेहमीच तत्पर असते. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे. पोलीस दलावर नागरिकांचा प्रचंड विश्वास असून लाचखोरी, भ्रष्टाचार व खंडणी अशा अप्रवृत्तीला बळी पडता कामा नये. पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल्या.
पर्यावरणाचा विचार करता, काळाची गरज लक्षात घेता स्वतंत्र सीएनजी पेट्रोल पंप व चार्जिंग स्टेशन उभारणीवर भर दिला पाहिजे. राज्यशासनाने इलेक्ट्रीकल वाहनाच्या वापराकरीता अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. वीजेची गरज लक्षात घेता, सोलारची व्यवस्था करुन विजेवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रदुषणचा विचार करता पेट्रोलपंपावर पीयूसी सेंटरची व्यवस्था करावी,असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अनुकंपा तत्वावर नियुक्ती
उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते कर्तव्यावर कार्यरत असतांना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यामध्ये पोलीस शिपाई रोहित वायकर, धनंजय भोसले, धनंजय आगवणे, ओंकार भोसले, राहुल कदम, तुषार दराडे व तुषार भोसले यांचा समावेश आहे.