ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांचें भाकीत

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार पुढील दोन महिन्यात कोसळणार आहे, असे भाकीत ठाकरे गटाचे नेते शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना वर्तविले.

शिवसेना शिंदे गटाकडून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जाहिरातीवर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत आहेत. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती दिल्याचे कालच्या जाहिरातीत म्हटले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही त्या जाहिरातीतून गायब झाल्यामुळे भाजपमध्ये दबक्या आवाजात नाराजी होती. यामुळे शिवसेनेने आज पुन्हा जाहिरात प्रसिध्द करून कालची चूक सुधारली. या विषयावर बोलताना खा. राऊत म्हणाले, राज्यात भाजप आणि शिंदे गटात छुपे युद्ध सुरू आहे. हे सरकार कोसळेपर्यंत ते सुरूच राहील. शिंदे सरकार पुढच्या दोन महिन्यात सत्तेवर राहणार नाही. कारण हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे. आमदार अपात्राते संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्याची मुदत दिली आहे. त्या आधारे दोन महिन्यात हे सरकार जाईल, असा दावाही खा. राऊत यांनी केला.

शिंदे गटाने कालच्या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वगळला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले, काल भाजपने विशेषत: फडणवीस यांनी बांबू घातल्यामुळे आज नवीन जाहिरात झळकलेली दिसते, असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही फटकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here