सर्व शाळांमधील विदयार्थ्यांसाठी एकच गणवेश

सर्व विषयांसाठी मिळून एकच पाठयपुस्तक- दीपक केसरकर

Twitter : @maharashtracity

मुंबई: शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत असून गुरूवारी शाळेचा पहिला दिवस आहे. राज्यातील शाळांमधील मुलांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे कमी करण्यात आले असून सर्व विषयांसाठी एकच पुस्तक घेउन ही चिमुरडी शाळांची पायरी चढणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेच्या मुलांसाठी हा निर्णय लागू असेल. त्याचसोबत सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच गणवेश देखील असणार आहे. मुलांना स्काय ब्लू रंगाचा शर्ट आणि डार्क ब्ल्यू रंगाची पँट तसेच मुलींना देखील स्काय ब्ल्यू रंगाचा शर्ट आणि डार्क ब्ल्यू रंगाचा फ्रॉक असा हा गणवेश असणार आहे. राज्यातील स्वयंअर्थसहायित आणि ज्यांना अनुदान जाहीर झालेले नाही अशा शाळा वगळता इतर सर्व शाळांना पाठयपुस्तका बाबतचा निर्णय लागू असेल. आतापर्यंत ४.३९ कोटी पुस्तके वितरित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्य सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय असल्याचेही ते म्हणाले. दीपक केसरकर यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विदयार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सर्व विषयांसाठी मिळून एकच पाठयपुस्तक असणार आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाल्याचे सांगून दीपक केसरकर म्हणाले, यंदाच्या वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मिळून एकच पुस्तक असणार आहे. या एकाच पुस्तकात सर्व विषयांचे पाठ देण्यात आले आहेत. प्रत्येक तिमाहीसाठी एक यानुसार चार टर्मसाठी चार पुस्तके असणार आहेत. या चार पुस्तकांचे मोफत वाटप केले जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विदयार्थ्यांना ही पुस्तके मिळणार आहेत. त्याचसोबत एक राज्य एक गणवेश योजना अंतर्गत सर्व सरकारी शाळांमधील विदयार्थी- विदयार्थिनींना एकच गणवेश असणार आहे. या वर्षी गणवेशाचा निधी शाळांच्या शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र पुढच्या वर्षापासून महिला बचतगटांना प्रशिक्षण देउन त्यांच्याकडून हा गणवेश शिवून घेण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

मुलांना गणवेशासोबतच बूट आणि सॉक्स देखील येत्या महिन्याभरात देण्यात येणार आहेत. तसेच मुलांमध्ये सेवेची भावना वाढीला लागावी म्हणून स्काउट आणि गाईड इयत्ता पहिलीपासूनच सक्तीचे करण्यात येणार आहे. खरी कमाईच्या माध्यमातून मुलांमध्ये सेवेची भावना रूजविता येईल असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

मुंबईतील महापालिका शाळांची रंगसफेदी

मुंबईतील सर्व महापालिका शाळांमध्ये नव्याने रंगरंगोटी करण्यात येणार आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळांची इमारत आल्हाददायक वाटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील महापालिका शाळांमधील मुलांसाठी लवकरच एक अभियान राबविण्यात येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here