By Anant Nalavade

Twitter : @NalavadeAnant

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय खजिनदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कारवाई केली. पटेल आणि तटकरे यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत असल्याची माहितीही पवार यांनी ट्विट करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल, रविवारी राज्यातील शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आठ आमदारही शपथबद्ध झाले. या शपथविधी सोहळ्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर दोघांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल तर खजिनदारपदी खासदार सुनील तटकरे यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, या दोन्ही नेत्यांनी बंडखोर नेते अजित पवार यांना साथ दिल्याने आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अशी कारवाई करण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे असा निर्णय कार्यकारिणीलाच घ्यावा लागेल, असे दावा अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांनी केला. प्रफुल्ल पटेल यांनीही अशी कारवाई करता येत नसल्याचे नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here