शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांचा इशारा

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: महापालिका कोविड घोटाळ्याच्या चौकशीला खरे पाहता विलंब झाला आहे. पहिल्या तीन महिन्यात कारवाई व्हायला हवी होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत संयम बाळगला आहे. सध्या जी कारवाई होत आहे ती गेल्यावर्षी दाखल झालेल्या तक्रारीवर होत आहे. त्यामुळे १ जुलैचा मोर्चा व या कारवाईचा काही संबंध नाही. कोविड घोटाळ्यातील सूरज चव्हाण व इतरांच्या चौकशीचे धागेदोरे निश्चितपणे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोचणार आहेत, असा इशारा देत, चव्हाण हा आदित्यची सावली बनून होता. त्यामुळे ईडीने अधिक जलद कारवाई करावी, अन्यथा माल कुठे तरी नेऊन ठेवतील, असा हल्लाबोल शिवसेना पक्षाचे सचिव, प्रवक्ते माजी आमदार किरण पावसकर यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्याचवेळी त्यांनी ठाकरे परिवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरही सडकून टीका केली.सामान्यांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला त्यांना माफ करुन चालणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली.

आजच्या ईडीच्या धाडीत आदित्यचे निकटवर्तीय सुरज चव्हाणकडे ४ कोटीची रोकड मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ही रक्कम व मालमत्ता केवळ शोरुममधील आहे. गोडाऊन मध्ये किती मिळेल याचा अंदाज लावा. त्यामूळे सुरजचा सुत्रधार आदित्य ठाकरेंपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सलग २४ वर्षे महापालिका ताब्यात असताना कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळाल्याने दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची वेळ आली. ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार कधी करणार, असा प्रश्न विचारत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा कांगावा करण्यापूर्वी मृतदेह नेणाऱ्या बॅगेची किंमत ६७१९ रुपये कुणी व कुणासाठी ठरवली, पुरवठा कुणी केला, पीपीई कीटची किंमत चढ्या भावाने का लावली याचे उत्तर द्यावे असेही त्यांनी ठणकावले.

मृतदेह नेणाऱ्या बॅगेच्या खरेदीत भ्रष्टाचार हा नीचपणाचा कळस आहे. घरी बसून बॅगेचा प्रकार काय असावा, किंमती किती असाव्यात हे ठरवले जात होते, असा आरोप पावसकर यांनी केला. दररोज पाच हजार पीपीई कीट घेतले गेले. मात्र त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही. रेमडेसीवीर एक इंजेक्शन हाफकिन मधून ६६५ रुपयांत मिळत असताना १५६८ रुपये देऊन त्याची खरेदी केली गेली. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात केला गेला, आणि असे असूनही अन्याय झाल्याची बोंब करायची, हा उबाठा गटाचा नीचपणा आहे.

कोविड काळाचा गैरवापर करुन आदित्य व उध्दव ठाकरे यांनी पैसे काढले, त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही पावसकर यांनी केली.

वांद्रे येथे शिवसेनेच्या नावावर अड्डा सुरु करण्यात आला होता. त्याद्वारे अनैतिक कामे केली जात होती व पैसे कमावले जात होते. त्यामुळे आज त्यावर कारवाई झाली त्याचा नागरिकांना आनंद झाला. तेथील विभागप्रमुख अनिल परब यांच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडताना शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. मात्र आजच्या कारवाईवेळी शिवसैनिक अथवा पदाधिकारी कोणीही उपस्थित नव्हता, यावर पावसकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. उबाठाची शिवसेना संपली याचे हे जिवंत उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

१ जुलै सुटीचा दिवस असताना मोर्चा काढून महापालिकेच्या वॉचमनला निवेदन देणार का? असा प्रश्न त्यांनी विचारत, माजी मंत्री असलेल्यांकडून जाणिवपूर्वक हा मुहूर्त काढला का? अशी विचारणाही त्यांनी केली.

मुंबई मपाहालिकेतील पैसा काढणे व खाणे हा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. त्यामुळे ते सैरभेर झाले आहेत. औरंगजेबाच्या कबरीला भेट देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत उध्दव यांचे फोटो दादर परिसरात लागले आहेत. त्यावर मुगल सम्राटा विरोधात लढलेल्या व मराठी साम्राज्य उभे करणाऱ्या शिवाजी महाराजांना गद्दार म्हणणार का? असा प्रश्न विचारत, औरंगजेबाची तळी उचलणाऱ्यांबाबत मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व राज्याने भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाटण्याला जाणाऱ्या उबाठा गटाकडे नगरसेवक, आमदार, खासदार नाहीत त्यामुळे तिथे जावून ते काय करणार आहेत, अशीही विचारणा त्यांनी केली.

उध्दव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला, आदित्य म्हणतो माझे वडिल हरवले आहेत. तर भोंगा बोलतो माझे दोन बाप आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे व त्यांना मदत करावी. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री किमान स्वतःची दाढी कुरवाळतात, तुमचे काय ते पाहा असा टोलाही त्यांनी लगावला. आदित्यने भोंग्याची शिकवणी लावली आहे. त्यामुळे तो मीडियाच्या कॅमेरावर थुंकला तर असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here