@maharashtracity

रस्ते कामांवर २४ वर्षात २१ हजार कोटींचा खर्च खड्ड्यात -: आ. अमित साटम यांचा आरोप

२० वर्षे सेनेबरोबर सत्ता उपभोगताना हा प्रश्न का पडला नाही ? -: शिवसेना 

मुंबई: मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते, खड्डे कामावरून सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व भाजप (BJP) यांच्यात आरोप, प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यानिमित्ताने कलगीतुरा रंगू लागला असल्याचे निदर्शनास येत आहे.    त्याचे झाले असे की, भाजपचे आमदार अमित साटम (BJP MLA Amit Satam) यांनी, मुंबई महापालिकेने रस्ते कामांवर गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी रुपयांची रक्कम पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या टोळीने खड्ड्यात घातल्याचा आरोप केला आहे. 

त्यावर सत्ताधारी शिवसेनेतर्फे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, पालिकेत गेली २० वर्षे सेनेबरोबर सत्ता उपभोगताना हा प्रश्न आमदार अमित साटम यांना का पडला नाही, त्यांना आताच कसे स्वप्न पडले, आताच कशी काय आठवण झाली, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत जाब विचारला आहे.   

तसेच, अमित साटम हे आमदार असून त्यांनी राज्याच्या कामात लक्ष द्यावे, त्यांनी रस्ते कामांबाबत बोलणे, टीका करणे म्हणजे पालिकेतील भाजप नगरसेवक, गटनेते यांना अकार्यक्षम ठरविण्यासारखे आहे, अशा तिखट शब्दात यशवन्त जाधव यांनी, आमदार अमित साटम यांना झणझणीत उत्तर दिले आहे.   अंधेरी (प.) येथील भाजपाचे आमदार अमित साटम यांनी, माहितीच्या कायद्याचा आधार घेऊन पालिकेकडून मागील २४ वर्षात रस्ते कामांवर २१ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती उघडकीस आणली असून या रस्ते कामांवर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा व या पैशांची लूट झाल्याचा आरोप व्हिडीओ वायरल करीत केला आहे.    

हे २१ हजार कोटी खड्ड्यात घालणारी पालिकेतील वाझे टोळी कोण, मुंबईत रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते हा प्रश्न रोज निर्माण होतो, असे प्रश्न साटम यांनी उपस्थित केले आहेत.   

 मात्र या आरोपांची म्हणावी तशी दखल न घेता स्थायी समिती अध्यक्ष यशवन्त जाधव यांनी, पालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेना व भाजपची सत्ता असताना अमित साटम हे नगरसेवक होते, मग त्यांनी त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत, त्यांना आता कोणी स्वप्नांत येऊन सांगितले की, त्यांना तसे स्वप्न पडले का, आताच त्यांना हे प्रश्न का पडले, एवढे वर्षे ते गप्प का बसले होते, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत आमदार साटम यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पालिकेवर प्रश्न उपस्थित करून त्यांनी आपल्या पक्षातील नगरसेवक, गटनेते यांच्या अकार्यक्षमतेवर शिक्का मारला आहे, अशी टीकाही यशवंत जाधव यांनी यावेळी आमदार साटम यांच्यावर केली आहे. साटम यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही यशवंत जाधव यांनी दिला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here