By Santosh More

Twitter: @MoreSantosh

मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष यांना निकालाद्वारे दिले होते. हा निर्णय विशिष्ट मुदतीत घ्या असे न्यायालयाने स्पष्ट केले नव्हते. मात्र, हा निकाल यायला येत्या १० जुलै रोजी दोन महिने पूर्ण होतील. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजूनही कुठलाही निर्णय घेतला नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

शिवसेनेत बंड करून भाजप सोबत सत्ता स्थापन केलेले एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र घोषित करण्याची याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने निर्णय लवकरात लवकर घेण्याची सूचना अध्यक्ष यांना करावी, ही मागणी घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेत बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, याकरिता ठाकरे गटाने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर या आमदारांना नरहरी झिरवळ यांनी नोटीस बजावली होती. त्या विरोधात शिंदे गटातील 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर नऊ महिन्याने निकाल दिला होता. हा विषय विधानसभा अध्यक्ष यांच्या अधिकाराखाली येतो असे नमूद करून विधानसभा अध्यक्ष यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

काय आहे अपात्रतेची याचिका?

# शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिले आहे.

# बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय यावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

# शिंदे सरकारने विधिमंडळात सादर केलेला बहुमताचा प्रस्ताव व त्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला शिवसेनेने आव्हान दिले आहे.

# मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांची विधिमंडळ गटनेतेपदी केलेली निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली होती. या निर्णयाला शिंदे गटाने आव्हान दिले आहे.

# शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी सुनील प्रभू यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यालाही शिंदे गटाने आव्हान दिले आहे.

# विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आव्हान देण्यात आले आहे.

कोण आहेत ते आमदार?

1) एकनाथ शिंदे

2) अब्दुल सत्तार 

3) संदीपान भुमरे 

4) प्रकाश सुर्वे 

5) तानाजी सावंत 

6) महेश शिंदे 

7) अनिल बाबर 

8) यामिनी जाधव 

9) संजय शिरसाट 

10) भरत गोगावले 

11) डॉ बालाजी किणीकर 

12) लता सोनावणे

13) सदा सरवणकर

14) प्रकाश आबिटकर

15) संजय रायमूलकर

16) रमेश बोरनारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here