By Milind Mane

Twitter : @manemilind70

मुंबई: राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात झालेला समावेश, तसेच रविवारी होणारा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार पाहता मंत्रालयावर अतिरिक्त खर्चासह गर्दीचा पडणारा ताण बघता तिन्ही गटाच्या मंत्र्यांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंत्र्याना मंत्रालयात दालने उपलब्ध करून देणे, त्या दालनाचे नूतनीकरण करणे तसेच त्यांना निवासस्थानाचे वाटप करणे व बंद असलेल्या काही निवासस्थानाचे नूतनीकरण करणे ही मंत्रालयातील अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरणार आहे.

गेले वर्षभर मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्यासह 20 सदस्यांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात होते. त्यामुळे मंत्रालयातील पूर्वीच्या मंत्र्यांची अनेक दालने आणि अनेक बंगले देखील वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. या सर्वांची डागबुजी व नूतनीकरण तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारानंतर पुन्हा नव्याने येणारे मंत्री व त्यांच्यासाठी करावी लागणारी दालने व बंगले यांची सोय सार्वजनिक बांधकाम विभागाला करावी लागणार आहे. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे डोकेदुखी निर्माण झाली आहे.

यापुढे मंत्रालयातील कारभार तीन पक्षाच्या आपापल्या कलेने चालणार आहे. त्यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांना एखाद्या मंत्र्यांनी सूचना केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना दुसऱ्या गटातील मंत्र्यांनी यावर हरकत घेतल्यास काय करावे, असा गंभीर प्रश्न मंत्रालयातील अधिकाऱ्यांपुढे निर्माण होणार आहे.

राज्यातील सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षाचे मंत्री असून राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासन राबविण्यात वाकबगार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे राज्याचा कारभार हाताळतांना मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकेल. त्याचबरोबर मंत्रालयात येणाऱ्या अभ्यंगतांना देखील तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न मंत्रालयातील अधिकाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. त्यातच नव्याने मंत्री होणाऱ्या शिंदे गटातील व भाजपातील तसेच राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांची गर्दी मंत्रालयात येत्या काळात पहावयास मिळणार आहे. या गर्दीतून पूर्वीचे एकमेकांचे कट्टर समर्थक मंत्रालयात आल्यास त्यातून भांडणाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मंत्रालयातील गृह खात्यातील अधिकाऱ्यांवर देखील मोठा ताण पडणार आहे. त्याचबरोबर मंत्रालयातील उपाहारगृहांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गर्दीचा अतिरिक्त ताण पडणार आहे.

शिंदे – फडणवीस व पवार यांच्या पक्षातील नव्याने मंत्री होणाऱ्या मंत्र्यांना द्यावे लागणारे कर्मचारी, तसेच मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, खाजगी सचिव व कार्यालयीन कर्मचारी कोणते द्यायचे, तसेच ते दिल्यानंतर मूळ खात्यातील कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त ताण कसा निभावून न्यायचा, असा प्रश्न मंत्रालयातील सचिव वर्गाला पडला आहे.

मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनाबाबत व मंत्र्यांच्या निवासस्थान संबंधी व त्यांना देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून अतिरिक्त ताण जसा मंत्रालयातील कारभारावर पडणार आहे, तसाच ताण मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी मंत्रालय व त्यांच्या निवासस्थानावर द्याव्या लागणाऱ्या गृहखात्यातील कर्मचाऱ्यांबाबत देखील गृह खात्यावर ताण पडणार आहे. यामुळे सर्वच अधिकाऱ्यांपुढे येत्या काळात मोठा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. मात्र या सर्व प्रकरणात सर्वसामान्य कर्मचारी भरडला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here