Twitter: @vivekbhavsar

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडाला अवघे दोन दिवस झाले आहेत. संपूर्ण पक्ष आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार करत असले तरी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील नेमके किती सदस्य त्यांच्यासोबत आहेत, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत ५४ आमदार आहेत. त्यापैकी किती आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेत आणि किती आमदार शरद पवारांसोबत अजूनही कायम आहेत, याबद्दल अजूनही संदिग्धता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे की या पक्षात वेगळा गट असेल, याबाबत निर्णय घेतलेला नाही. या तांत्रिक आणि घटनात्मक बाबींचा निकाल लागण्याआधीच विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी काँग्रेसला घाई झाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलेले अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायदा लागू व्हायचा नसेल तर त्यांना दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असणे कायदेशीर दृष्ट्या अत्यावश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्याकडे आतापर्यंत फक्त 31 आमदारांनी समर्थनाच्या सह्या दिलेल्या आहेत. अजूनही काही आमदार संभ्रमात आहेत, तर काही आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. शरद पवार यांना भेटून काही आमदार आपली भूमिका मांडत आहेत. अशावेळी दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ जुळवण्याचं आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत 54 आमदार आहेत. त्यातील दोन तृतीयांश अर्थात 36 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र अजित पवार यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्यावे लागेल. त्यानंतरच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र गट विधिमंडळात बसू शकेल. आपलाच पक्ष अधिकृत राष्ट्रवादी, असा दावा अजित पवार करत असले तरीही त्याला अजूनही कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेले नाही. 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून मुंबई सुरू होत आहे. हे अधिवेशन सुरू होण्याआधीच अजित पवार यांचा मूळ पक्ष की अजित पवार गट यांचा स्वतंत्र गट याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे जाईल की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच राहील, याचा निर्णय होऊ शकेल. शरद पवार बंडखोर आमदारांशी संपर्क साधून परत येण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो आणि अजित पवारांसोबत गेलेले किती आमदार परत येतात हे पाच तारखेच्या बैठकीत किंवा त्या बैठकीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला तर अजित पवारांचे बंड पुन्हा एकदा फसू शकते.

दरम्यान, काँग्रेसची विधानसभेतील सदस्य संख्या ४४ आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली आहे, हे सत्य आहे. त्यामुळे या घडीला सर्वाधिक सदस्य काँग्रेसकडेच असल्याचे दिसते आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाईल, हे स्पष्ट असले तरीही जोपर्यंत अजित पवार यांच्या बंडाला वैधानिक अधिष्ठान प्राप्त होत नाही, त्यांना अधिकृत मान्यता मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पदावर दावा करता येणार नाही. 

दरम्यान, आज काँग्रेस पक्षाने त्यांच्या सर्व आमदारांची बैठक विधानभवनात बोलावली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांच्यासह पक्षाचे प्रभारी एच के पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विरोधी पक्ष नेते पदासाठी कोणाच्या नावाची शिफारस करायची याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here