@maharashtracity

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी (BJP) युती करावी असे, आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.

काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहेत. दोन्ही कॉंग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न साकार करण्यासाठी; छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना भाजपने एकत्र यावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

काँग्रेस आणी राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेने भाजपशी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना-भाजप नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही, अशी प्रताप सरनाईक यांची सूचना योग्य आहे. त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांनी या पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी शी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here